पाकिस्तानचे नापाक इरादे; नागरी वस्तींवर ड्रोन हल्ले, फिरोजपूरमध्ये पाकिस्तानी ड्रोनमुळे 3 जखमी; पोलिसांची माहिती

drone attacked by pakistan

शुक्रवारी रात्री पंजाबमधील फिरोजपूरमध्ये नागरी वस्त्यांवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला केल्यानंतर एकाच कुटुंबातील किमान तीन जण गंभीर जखमी झाले. तिघांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानी ड्रोन एका घरावर धडकले आणि घराने पेट घेतला, ज्यामुळे तिघेही भाजल्याचे वृत्त आहे.

‘आम्हाला तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळाली. भाजले गेल्याने त्यांना जखमा आहेत. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहे. मात्र त्याच वेळी सैन्याने पाकिस्तानकडून धाडलेले ड्रोन निष्क्रिय केले आहेत’, असे वृत्त वृत्तसंस्था एएनआयने जारी केले आहे. फिरोजपूरचे पोलीस अधिकारी भूपिंदर सिंग सिद्धू यांनी ही माहिती दिल्याचे कळते आहे.

पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यात लखविंदर सिंग, त्यांची पत्नी आणि भाऊ मोनू सिंग गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पीटीआयने वृत्त दिले आहे. लखविंदरची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानने पंजाब, जम्मू आणि कश्मीर आणि राजस्थानमधील हिंदुस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांवर ड्रोन हल्ला केल्यामुळे ही घटना घडली. या राज्यांमधील 25 हून अधिक ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात आले, त्यापैकी अनेक ठिकाणांना हिंदुस्थानच्या हवाई संरक्षण प्रणालींनी रोखले.

22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानी दहशतवादी छावण्यांविरुद्ध हिंदुस्थानने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर गुरुवारी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर (एलओसी) युद्धबंदीचे उल्लंघन केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिक ठार झाले होते. पाकिस्तानचे समर्थन असलेल्या दहशतवाद्यांनी 26 नागरिकांना गोळ्या घालून त्यांची हत्या केली होती.

3 Injured As Pak Drone Hits Residential Area In Punjab’s Ferozepur: Police