
हिंदुस्थान आणि इंग्लंड संघांदरम्यान खेळले जाणारे तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने महाराष्ट्रात होणार आहेत. महाराष्ट्रातील सध्याची कोविड स्थिती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले आवाहन यानुसार हे तिन्ही सामने कोविडचे सर्व नियम पाळून प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय महाराष्ट्र आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या दोन्ही संघटनांनी घेतला आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विलास काकतकर आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या गव्हर्निंग काौन्सिलचे चेअरमन, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची यासंदर्भात भेट घेतली. या वेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेसुद्धा उपस्थित होते.
या तिन्ही सामन्यांदरम्यान सहभागी होणारे दोन्ही संघांचे खेळाडू आणि पदाधिकारी यांची योग्य ती काळजी घ्यावी तसेच कोविडचे नियम कटाक्षाने पाळावेत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी केल्या. मुख्यमंत्र्यांनी सामन्यांच्या आयोजनाला परवानगी दिल्याने आता आयोजनासाठी आवश्यक इतर परवानग्या मिळवण्याचा मार्ग सोपा झाला आहे, अशी प्रतिक्रिया काकतकर यांनी या वेळी दिली. मुख्यमंत्र्यांचे याबद्दल आभार मानतानाच या लढतीच्या यशस्वी संयोजनासाठी बीसीसीआयचे आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे, असेही साकडे या वेळी एमसीए अध्यक्ष काकतकर यांनी घातले.




























































