Ind Vs Nz Test Match अय्यरच्या पदार्पणीय कसोटी शतकानंतर न्यूझीलंडने टीम इंडियाला दमवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कानपूरच्या ग्रीन पार्कवर सुरू असलेल्या हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघांतील पहिल्या क्रिकेट कसोटी लढतीचा दुसरा दिवस सकाळी टीम इंडियाचा पदार्पणीय शतकवीर श्रेयस अय्यर (171 चेंडूंत 105) याने तर दुपारचे सत्र न्यूझीलंडचे सलामीवीर फलंदाज टॉम लॅथम (नाबाद 50) आणि विल यंग (नाबाद 75) या जोडीने गाजवला. या दोघांच्या खडूस फलंदाजीमुळे पाहुण्या न्यूझीलंडला दुसऱया दिवसअखेर पहिल्या डावात 57 षटकांत बिनबाद 129 अशी दमदार मजल मारता आली. त्याआधी मुंबईकर श्रेयस अय्यरच्या शतकामुळे हिंदुस्थानी संघाला 111.1 षटकांत सर्वबाद 345 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता  आली.

कानपूरच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱया दिवशी हिंदुस्थानच्या पहिल्या डावाला 4 बाद 258 या धावसंख्येवरून पुढे सुरुवात झाली. श्रेयस अय्यरने आजही आपला तुफानी अंदाज कायम ठेवत आपले पहिलेवहिले कसोटी शतक 171 चेंडूंत झळकावले. त्याला सुरेख साथ देणारा रवींद्र जाडेजा (112 चेंडूंत 50) आज विशेष कामगिरी करू शकला नाही. साऊदीने त्याला त्रिफळाचित केले. अय्यर-जाडेजा जोडीने पाचव्या विकेटसाठी 226 चेंडूंत 121 धावांची मोठी भागीदारी रचत संघाच्या डावाला आकार दिला. त्यानंतर रविचंद्रन अश्विन  (55 चेंडूंत 38 ) वगळता अन्य हिंदुस्थानी फलंदाज  टीम साऊदीच्या झंझावाती गोलंदाजीपुढे निष्प्रभ ठरले. टीम साऊदीने अफलातून स्विंग मारा करीत हिंदुस्थानच्या 5 फलंदाजांना 69 धावांच्या मोबदल्यात तंबूत पाठवले.

श्रेयस पदार्पणातच कसोटी शतक झळकावणारा 16 वा हिंदुस्थानी

न्यूझीलंड आणि हिंदुस्थानी संघातील या पहिल्या कसोटीत आपले पदार्पण साजरे करीत श्रेयस अय्यरने पदार्पणातच कसोटी शतक झळकावण्याचा पराक्रम केला. असा पराक्रम करणारा तो हिंदुस्थानचा 16 वा तर जगातला 112 वा क्रिकेटपटू ठरला आहे. आपल्या या पराक्रमामुळे मुंबईचा हा पठ्ठय़ा लाला अमरनाथ, गुंडाप्पा विश्वनाथ, सुरिंदर अमरनाथ, मोहम्म्मद अझरुद्दीन, प्रवीण अमरे, सौरभ गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा या महान हिंदुस्थानी फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. याआधी ए. जी. कृपालसिंह (नाबाद 100) आणि सुरिंदर अमरनाथ (124 ) यांनी कसोटी पदार्पणात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी शतक झळकावले आहे.

लॅथम-यंग जोडीने हिंदुस्थानी गोलंदाजांना थकवले

हिंदुस्थानच्या 345 धावांचा पाठलाग करताना पाहुण्या न्यूझीलंडने पहिल्या डावात बिनबाद 129 अशी दमदार मजल मारत दुसऱया दिवसाचा उत्तरार्ध गाजवला. सलामीवीर टॉम लॅथम (नाबाद 50) आणि विल यंग (नाबाद 75) या जोडीने 129 धावांची दमदार सलामी देत विक्रमी कामगिरी साकारली. टीम इंडियाच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी आज एकूण 57 षटके टाकली, पण त्यांना पाहुण्यांचा एकही फलंदाज बाद करता आला नाही. न्यूझीलंड यजमान संघापेक्षा अजून 216 धावांनी मागे असला तरी त्यांच्या भक्कम सलामीमुळे पाहुणे सध्या तरी भक्कम स्थितीकडे वाटचाल करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे 2016 नंतर कोणत्याही पाहुण्या संघाच्या सलामीवीरांना हिंदुस्थानी भूमीत  टीम इंडियाविरुद्ध शतकी सलामी देता आली नव्हती. तो विक्रम आज किवीजच्या लॅथम-यंग जोडीने साकारला. लॅथम आज नशिबवानच ठरला. तीन डीआरएसमधून तो सहीसलामत नाबाद राहिला.

संक्षिप्त धावसंख्या

हिंदुस्थान – पहिला डाव 111.1 षटकांत सर्वबाद 345  (शुभमन गिल 52, अजिंक्य रहाणे 35, श्रेयस अय्यर 105, रवींद्र जाडेजा 50, आर. अश्विन 38; टीम साऊदी 27.4 षटकांत 69 धावांत 5 विकेट, काईल जेमिसन 23.2 षटकांत 91 धावांत 3 विकेट).

 न्यूझीलंड – पहिला डाव 57 षटकांत बिनबाद 129  (टॉम लॅथम नाबाद 50, विल यंग नाबाद 75).