
हिंदुस्थानी पुरुष ज्युनियर हॉकी संघ आज (दि. 2) एफआयएच ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपमधील आपल्या शेवटच्या गट सामन्यात स्वित्झर्लंडशी भिडणार आहे. हिंदुस्थानी खेळाडू फॉर्मात असले, तरी अद्यापि त्यांची तुल्यबळ लढत झालेली नाहीये. त्यामुळे बाद फेरीपूर्वी कमकुवत बाजू सुधारण्यावर संघाचा भर असणार आहे.
‘ब’ गटात हिंदुस्थान आणि स्वित्झर्लंड या दोन्ही संघांनी दोनही सामने जिंकत अजेय कामगिरी केली आहे. हिंदुस्थानी संघ गोलफरकाच्या आधारे अव्वलस्थानी आहे. चेन्नईत हिंदुस्थानी संघाने पहिल्या दोन सामन्यांत ‘दे दणादण’ गोल करीत चिलीवर 7-0 आणि ओमानवर 17-0 असा दणदणीत विजय मिळविला.
स्वित्झर्लंडने ओमानचा 4-0 असा पराभव केला, तर चिलीवर 3-2 असा निसटता विजय मिळविला. हिंदुस्थानकडून उद्याही मोठय़ा विजयाची अपेक्षा आहे, जेणेकरून ‘नॉकआऊट’पूर्वी संघाची गती आणखी मजबूत होईल. तरीही काही क्षेत्रांमध्ये हिंदुस्थानला सुधारणा करावी लागणार आहे. स्वित्झर्लंडविरुद्धचा सामना हा हिंदुस्थानचा मदुराईमध्ये एकमेव सामना असून त्यानंतर संघ चेन्नईत परतून उर्वरित सामने खेळणार आहे. स्थानिक परिस्थितीशी खेळाडू कितपत जुळवून घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




























































