India vs West Indies – यशस्वीचा कपाळावर हात!

>> संजय कऱ्हाडे

यशस्वीने रेखाटलेल्या सुंदर चित्रावर कप्तान शुभमनने शाई फेकली! अन् अत्यंत कल्पकतेने विणलेल्या द्विशतकी स्वप्नाची धूळधाण उडवली. यशस्वीचं तिसरं द्विशतक हुकलं… एका धावेसाठी केलेल्या यशस्वीच्या पुकाऱयाला गिलने पाठ दाखवली तिथेच घात झाला! गेल्या वर्षी यशस्वीला अशीच निर्दयी पाठ विराटने ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात दाखवली होती. तेव्हा यशस्वी शतक पूर्ण करण्याची अपेक्षा करीत 82 वर नाबाद होता आणि शुक्रवारी 175 धावांवर!

समोरच्या किनाऱयावर उभ्या असणाऱया साथी फलंदाजाच्या मागे चेंडू गेला की त्याने मनात कुठलीही शंका न ठेवता फक्त धावायचं असतं. चेंडूकडे बघत राहायचं नसतं, हा मूळ नियम! मग त्याला विराट आणि शुभमनसारखे मुरलेले बंदे कसे बळी ठरतात हा प्रश्नच आहे. धावचीत होणारा फलंदाज मात्र तोच असतो! धावचीत झाल्यानंतरचं यशस्वीचं कपाळावर हात मारणं बरंच सांगून गेलं. काही दिग्गजांनी, तज्ञांनी चूक यशस्वीचीच असल्याचं म्हटलं तेव्हा मीसुद्धा कपाळावर हात मारला! गंभीर अन् गिलच्या संघावर टीका करायची नाही असा फतवा निघालाय की काय कोण जाणे!

शुभमनवर मी कुठला आरोप करणार नाही. पण मनात विचारांचं काहूर माजलेलं असतं तेव्हा अशा चुका घडू शकतात हे मला म्हणायचंय! तुमचे विचार तुमची एकाग्रता विस्कळू शकतात. शुभमनच्या पाठ दाखवण्यात वन डे संघात झालेला ‘रो-को’चा समावेश जबाबदार नसावा असं मनाला पटवण्याचा माझा प्रयत्न आहे.

अर्थात, शुभमनने झळकवलेल्या निर्दोष नाबाद शतकाने माझ्या मनातल्या शंकाखोर बैलाच्या नाकात वेसण घातली. त्याचं हे दहावं शतक. यशस्वी आपल्या चुकीमुळे बाद झाला नाही याबद्दल तो निःशंक असावा. गेल्या चारएक महिन्यांत सात कसोटी सामन्यांत त्याने फटकावलेलं हे पाचवं शतक! शतकांची ही आतषबाजी त्याला ऑस्ट्रेलिया दौऱयाच्या दृष्टीने एक कर्णधार म्हणून मजबूत बनवेल. विंडीजचं राष्ट्रगीत सुरू झालंय. ते आज संपतंय की उद्या एवढाच आता प्रश्न आहे…