
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ( आयएमएफ) 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक विकास अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. या अहवालात आयएमएफने हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज वर्तविताना तो 6.8 टक्के राहणार असल्याचे म्हटले आहे. जगात सध्या मंदीचे सावट असतानाही हिंदुस्थान सर्वात वेगाने आगोकूच करणारी अर्थव्यवस्था असल्याचे आयएमएफकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने 2022-23 या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 7 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.
चीनचा विकासदर 2021 मध्ये 8.1 टक्के होता. तर 2022 मध्ये तो 3.2 टक्क्यांपर्यंत घसरला होता. मात्र, आयएमएफच्या ताज्या अहवालात 2022-23 या चालू आर्थिक वर्षासाठी चीनचा विकासदर 4.4 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिंदुस्थानच्या विकासदरापेक्षा तो कमी आहे. आयएमएफनुसार देशातील महागाई आणि बेरोजगारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याबरोबच करोनामुळे उद्भवलेली आव्हाने अद्यापतरी संपलेली नाही. अशा जागतिक परिस्थितीत हिंदुस्थानची अर्थव्यवस्था उभारी घेईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवला आहे.






















































