हिंदुस्थानची दणदणीत विजयी सलामी, यजमान इंग्लंडचा 97 धावांनी धुव्वा

फोटो - बीसीसीआय

हिंदुस्थानी महिलांनी यजमान इंग्लंडचा 97 धावांनी धुव्वा उडवित पहिला टी-20 क्रिकेट सामन्यात दणदणीत विजय मिळविला. कर्णधार स्मृती मानधनाचे दणकेबाज शतक आणि श्री चरणीचे 4 बळी ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली. स्मृती हीच या विजयाची मानकरी ठरली. या विजयासह हिंदुस्थानी महिलांनी पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

हिंदुस्थानकडून मिळालेल्या 211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 14.5 षटकांत 113 धावांवर गारद झाला. त्यांच्याकडून कर्णधार नॅट सायव्हर-ब्रेट हिनेच 42 चेंडूंत 10 चौकारांसह 66 धावांची खेळी करीत एकाकी झुंज दिली. याचबरोबर टॅमी ब्यूमोंट (10) व एम अर्लोट (12) इतर दुहेरी धावा करणाऱ्या फलंदाज ठरल्या. हिंदुस्थानकडून श्री चरणी हिने सर्वाधिक 4 फलंदाज बाद करून इंग्लंडच्या फलंदाजीची दाणादाण उडविली. दीप्ती शर्मा व राधा यादव यांनी 2-2 बळी टिपले, तर अमनजोत कौर व अरुंधती रेड्डी यांनी 1-1 फलंदाज बाद केल्या.

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानी संघाने 5 बाद 210 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. कर्णधार स्मृती मानधना (112) व पुनरागमन करणारी शफाली वर्मा (20) यांनी 51 चेंडूंत 77 धावांची खणखणीत सलामी दिली. शफाली बाद झाल्यानंतर स्मृतीने हलॉन देवोलच्या (43) साथीत दुसऱ्या विकेटसाठी 43 चेंडूंत 94 धावांची लयलूट केली. त्यानंतर रिचा घोष (12), जेमिमा रॉ ड्रिग्ज (0) लवकर बाद झाल्या. 62 चेंडूंत 15 चौकार व 3 षटकारांसह 112 धावांवर स्मृती बाद झाली. अखेरच्या षटकात हाणामारीच्या नादात स्मृती बाद झाली, तोपर्यंत हिंदुस्थानने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला होता. इंग्लंडकडून लॉ रेन बेलने 3, तर एम अलॉट व सोफी एक्लेस्टोन यांनी 1-1 बळी टिपला.

मराठमोळ्या स्मृतीचा इंग्लंडमध्ये धमाका; T20 मध्ये शतक ठोकत रचला इतिहास, असा पराक्रम करणारी पहिलीच

स्मृतीचे ऐतिहासिक शतक

स्मृती मानधनाचे शतक ऐतिहासिक ठरले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारी हिंदुस्थानची पहिली महिला फलंदाज, तर जगातील पाचवी क्रिकेटर ठरली. याचबरोबर आंतरराष्ट्रीय महिला टी-20 क्रिकेटमध्ये हरमनप्रीत कौरनंतर शतक ठोकणारी स्मृती दुसरी फलंदाज ठरली, शिवाय इंग्लंडविरुद्ध टी-20 शतक ठोकणारी स्मृती मानधना ही तिसरी कर्णधार ठरली.