
दुबई येथे सुरू असलेल्या एयर शोदरम्यान आज हवेतील कवायती सादर करताना हिंदुस्थानी हवाई दलाचे ‘तेजस’ लढाऊ विमान कोसळले. दुर्दैवाने त्यात वैमानिकाचा मृत्यू झाला. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश हवाई दलाने दिले आहेत.
दुबई येथे अल मकतुम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित एयर शोमध्ये अनेक देशांच्या हवाई दलांच्या कवायती सादर होणार होत्या. ‘तेजस’चा देखील त्यात समावेश होता. आजच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार ‘तेजस’ला दुपारी स्थानिक वेळेनुसार 2.15 ते 2.23 वाजेपर्यन्त एकूण 8 मिनिटे कवायती सादर करण्यासाठी दिली होती. विमान 2 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास म्हणजेच भारतीय प्रमाण वेळेनुसार 3 वाजून 40 मिनिटांनी विमान आकाशात झेपावल्यानंतर लगेच कोसळले. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. त्यात वैमानिक वाचू शकला नाही. अपघातानंतर 2 तास एयर शो थांबविण्यात आला होता. शो सुरू करण्यात आल्यानंतर रशियाच्या सुखोई-57 च्या कवायती सादर केल्या.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, हिंदुस्थानी संरक्षण मंत्रालय, युएईचे संरक्षण मंत्रालय, हिंदुस्थानी हवाई दल तसेच तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले असून मृत्युमुखी पडलेल्या वैमानिकाच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत.
कशामुळे झाला अपघात ?
विमान अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. विमान आकाशात झेपावल्यानंतर वैमानिकाने ’निगेटिव्ह जी-फोर्स टर्न’ चे प्रात्यक्षिक केले. मात्र त्याच वेळी विमानवरील नियंत्रण सुटले. या प्रात्यक्षिकात विमान वेगाने खाली येते आणि जमिनीजवळून पुन्हा आकाशात झेपावते. मात्र वैमानिकाला विमान वर नेता आले नाही. हवाई दलाने याप्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.
वैमानिक नमांश यांची पत्नीही वायुदलात अधिकारी
दुबई येथे वीरमरण मिळालेल्या वैमानिकाची ओळख पटविण्यात आली आहे. विंग कमांडर नमांश स्याल (34) असे त्यांचे नाव असून ते मूळचे हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील रहिवासी आहेत. नमांश यांच्या कुटुंबात आईवडील, पत्नी आणि एक मुलगी आहे. नमांश यांची पत्नीदेखील वायुदलात ग्राऊंड ऑफिसर आहे. त्यांचे वडीलदेखील हिंदुस्थानी सैन्यात अधिकारी होते. दुबई येथे अपघात झाला त्यावेळी नमांश यांचे आईवडील हैदराबाद येथे फिरायला गेले होते.
पहिल्यांदाच तेजसच्या वैमानिकाचा मृत्यू
यापूर्वी मार्च 2024 मध्ये राजस्थानात जैसलमेर जवळ तेजस विमान कोसळले होते. त्यावेळी वैमानिकाला सुखरूप बाहेर पडता आले होते. मात्र, आजच्या अपघातात वैमानिक बाहेर पडू शकला नाही. 2001 मध्ये तेजसने प्रथमच उड्डाण केले होते. तेव्हापासून प्रथमच तेजसच्या वैमानिकाचा मृत्यू झाला आहे.
वैमानिकाने वाचविले अनेकांचे प्राण
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट केला. त्यात विमान कोसळण्यापूर्वी वैमानिकाने इजेक्ट केलेले नसल्याचे आढळून आले. त्याने अखेरच्या काही सेकंदांपूर्वी विमान खाली येण्यापूर्वी वळविले आणि प्रेक्षक ज्या दिशेला बसले होते, त्याच्या विरुद्ध दिशेला नेले. या शेवटच्या टप्प्यात वैमानिकाने अनेकांचे प्राण वाचविले.
































































