असा धडा शिकवू की त्यांच्या पिढ्या लक्षात ठेवतील, ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडीओ समोर

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. हिंदुस्थानी लष्कराने दाखवलेल्या या शौर्याची भीती अजूनही पाकिस्तानमध्ये आहे. आता हिंदुस्थानी लष्करानेही हे स्पष्ट केले आहे की, ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला नव्हता तर न्याय होता.

हिंदुस्थानी लष्कराच्या वेस्टर्न कमांडने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानविरुद्ध लष्कराच्या कारवाईची झलक स्पष्टपणे दिसते. हा 54 सेकंदांचा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ वेस्टर्न कमांडच्या लोगोने सुरू होतो. त्यानंतर काही सैनिक हल्ला करण्याच्या स्थितीत दिसतात. व्हिडीओमध्ये एक लष्करी जवान म्हणतो, “हे सर्व पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून सुरू झाले. राग नव्हता, लाव्हा होता. मनात फक्त एकच गोष्ट होती… यावेळी आपण त्यांना असा धडा शिकवू की त्यांच्या पिढ्या लक्षात ठेवतील. ही सूडाची भावना नव्हती, हा न्याय होता.”