हिंदुस्थानी बॉक्सर्सना सरावासाठी युरोपला नेण्याचा प्रस्ताव, साईच्या टीमकडून निर्णयाची प्रतीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात कोरोनावर अद्याप नियंत्रण मिळवता आलेले नाही. त्यामुळे शारीरिक फिटनेसच्या दृष्टीने चांगला सराव केल्यानंतरही टोकियो ऑलिम्पिकसाठी सज्ज होत असलेल्या हिंदुस्थानी बॉक्सर्संना फाइटचा सराव करायला मिळालेला नाही. बॉडी कॉण्टॅक्टमुळे संसर्ग होण्याची भीती असल्यामुळे केंद्र सरकारकडून आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागत आहे. याप्रसंगी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रशिक्षक व हाय परफॉर्मन्स संचालक सॅण्टियागो निएवा यांच्याकडून टोकियो ऑलिम्पिकसाठी रेडी होत असलेल्या बॉक्सर्सना 45 दिवसांच्या युरोप दौऱयावर नेण्याचा प्रस्ताव स्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ इंडिया (साई) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. हिंदुस्थानी बॉक्सर्सना युरोप दौऱयावर जाण्याची परवानगी द्यायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय साईची विभागीय टीम घेणार आहे.

दोन अडथळे

हिंदुस्थानी बॉक्सर्संना युरोप दौऱयावर नेण्याचा प्रस्ताव यावेळी साईसमोर सादर करण्यात आलाय. पण प्रत्यक्षात या सरावाला ग्रीन सिग्नल मिळण्याआधी दोन महत्त्वपूर्ण अडथळ्यांना कसे ओलांडायचे हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. सध्या जर्मनी व फ्रान्समध्ये हिंदुस्थानींना परवानगी देण्यात आलेली नाही. फक्त नोकरी करणाऱयांना तसेच अभ्यासासाठी येणाऱयांनाच तेथे येण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. पण केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून स्पेशल पत्र पाठवण्यात आल्यास खेळाडूंना सरावासाठी परवानगी मिळू शकते. तसेच प्रत्येक देशामध्ये कोरोनाची स्थिती वेगवेगळी आहे. तेथील क्वारंटाइनचा कालावधी वेगवेगळा आहे. यामुळेही अडचण निर्माण होऊ शकते.

प्रस्तावातील तीन पर्याय खालीलप्रमाणे

प्लॅन ए : ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात सरावासाठी इटलीला जायचे. त्यानंतर 27 ते 31 ऑक्टोबर महिन्यात फ्रान्स येथे होणाऱया आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंना सहभागी करायचे. यानंतर 2 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत पोलंड येथे होणाऱया स्पर्धेत उतरून पुन्हा एकदा सराव करवून घ्यायचा. यादरम्यान तेथेच दोन आठवडे राहून आणखी काही स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव मिळवायचा. नोव्हेंबरच्या अखेरीस पुन्हा इटलीमध्ये यायचे. तेथे ट्रेनिंग करीत काही फ्रेंडली सामने खेळायचे आणि पुन्हा मायदेशात यायचे.

प्लॅन बी : बेलारूसमधील मिन्स्क येथे सराव करायला जायचे. तेथील राष्ट्रीय संघासोबत फ्रेंडली मालिका खेळायची.

प्लॅन सी : बॉक्सिंगमधील दादा संघ म्हणून ओळखल्या जाणाऱया कझाकस्तानमध्ये जायचे. सध्या तेथे आशिया खंडातील इतर देशांचे बॉक्सर्सही सराव करीत आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंसोबत तेथे सराव करायला मिळू शकतो.