
आखाती देशांतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीत मोठी दुर्घटना घडली आहे. इराणकडून डागलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अमिरातीच्या हवाई संरक्षण दलाने हवेतच नष्ट केले. या क्षेपणास्त्राचे अवशेष अंगावर कोसळल्याने अबु धाबीमध्ये एका हिंदुस्थानी नागरिकासह दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये देखील एका हिंदुस्थानी नागरिकाचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अबु धाबी येथील स्वीहान स्ट्रीट परिसरात क्षेपणास्त्राचे अवशेष कोसळले. या घटनेत एकूण दोन जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये एका हिदुस्थानी नागरिकाचा समावेश आहे. तसेच, अन्य तीन जण जखमी झाले असून त्यामध्ये हिंदुस्थान, जॉर्डन आणि यूएईच्या नागरिकांचा समावेश आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे आखाती देशांत वास्तव्यास असलेल्या हिंदुस्थानी नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. हिंदुस्थानी दूतावास या प्रकरणावर लक्ष ठेवून असून मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
























































