IRCTC अॅपने तिकीट काढताय? सावधान! वाचा बातमी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लांब पल्ल्याच्या ट्रेनचं तिकीट काढण्यासाठी जर तुम्ही आयआरसीटीसी अॅप्लिकेशनचा वापर करत असाल तर सावधान, असा इशारा रेल्वेनेच दिला आहे. कारण, तुम्ही ऑनलाईन फसवणुकीला बळी पडू शकता आणि तुमच्या खात्यातली रक्कम जाऊ शकते. सायबर चोरांनी हा एक नवीन मार्ग शोधून काढला असून त्यातून काही जणांची फसवणूकही करण्यात आली आहे.

IRCTC हे मूळ अॅप्लिकेशन तिकीट काढण्यासाठी सुरक्षित आहे. मात्र, त्याच नावाशी साधर्म्य साधणारं एक बनावट अॅप्लिकेशन आलं असून ते डाउनलोड केल्यास फसवणूक होऊ शकते. त्यामुळे याच नावासारखं दिसणारं irctcconnect.apk हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करून नये, असा इशारा IRCTCने दिला आहे. हे अॅप वापरण्यासाठी लिंक्स तयार करण्यात आल्या असून त्या व्हॉट्सअॅप, टेलिग्रामसारख्या मेसेजिंग अॅप्लिकेशनवर फिरवल्या जात आहेत.

हे बनावट अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये व्हायरसचा शिरकाव होऊ शकतो. सायबर चोर अशा अॅपच्या माध्यमातून पिन, ओटीपी, पासवर्ड, क्रेडिट आणि डेबिट कार्डाचे तपशील, नेटबँकिंगचा पासवर्ड, यूपीआयचे तपशील मागून तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे काढून घेऊ शकतात. त्यामुळे IRCTC Rail Connect हे अधिकृत अॅप्लिकेशनच डाऊनलोड करावं, असं आवाहन IRCTCने केलं आहे.