
हिंदुस्थानी लोक दररोज सरासरी 8 ग्रॅम मीठ खात असून, हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ठरवलेल्या 5 ग्रॅमच्या दैनंदिन मर्यादेपेक्षा जास्त आहे, असे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) ताज्या अभ्यासातून समोर आले आहे. या अभ्यासातून असेही दिसून आले आहे की, पुरुषांपेक्षा महिला आणि ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील लोक जास्त मीठ खातात. यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
ICMR आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस यांनी संयुक्तपणे हा अभ्यास केला. ज्यामध्ये देशभरातील 18 वर्षांवरील 3000 हून अधिक व्यक्तींचा समावेश होता. या अभ्यासातून असे दिसून आले की, हिंदुस्थानींच्या आहारात मिठाचा वापर सातत्याने वाढत आहे. विशेषतः प्रक्रिया केलेले पदार्थ (प्रोसेस्ड फूड), जंक फूड आणि बाहेरचे अन्न यामुळे मीठाचे सेवन अनियंत्रित होत आहे.
अभ्यासानुसार, ग्रामीण भागातील लोक सरासरी 7.3 ग्रॅम मीठ खातात, तर शहरी भागात हे प्रमाण 8.9 ग्रॅम आहे. पुरुषांचे सरासरी मीठ सेवन 8.3 ग्रॅम असून, महिलांचे 7.7 ग्रॅम आहे. यामुळे हिंदुस्थानातील उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराच्या वाढत्या रुग्णसंख्येशी थेट संबंध असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ICMR ने लोकांना मीठाचे सेवन कमी करण्याचे आणि आहारात ताजे फळ, भाज्या आणि कमी मीठ असलेले पदार्थ खाण्याचे आवाहन केले आहे.