
अनेकदा सायफाय चित्रपटांमध्ये आपण एखादी वस्तू किंवा रोबोट तुटला की पुन्हा आपोआप जोडला गेलेला दिसतो. ही बाब खरंतर काल्पनिक चित्रपट, कथा आणि कादंबऱ्यांमध्ये हे आपण बऱ्याचदा वाचतो किंवा पाहतो. पण, हे खऱ्या आयुष्यात लवकरच शक्य होण्याची चिन्हं आहेत.
कोलकाता येथील भारतीय विज्ञान आणि संशोधन संस्था तसंच खड्गपूर येथील भारतीय प्रौद्योगिकी संस्था अर्थात आयआयटीच्या काही शास्त्रज्ञांनी एका विशिष्ट घटकाचा शोध लावला आहे, जो अगदी काही सेकंदात तुटलेली वस्तू पुन्हा आपोआप दुरुस्त करू शकतो.
अमेरिकेतील एका प्रसिद्ध जर्नलमध्ये हा शोध प्रकाशित करण्यात आला आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला जी स्वउपचार प्रणाली विकसित केली गेली होती, तिचा वापर एअरोस्पेस, अभियांत्रिकी आणि स्वयंचलित विभागांमध्ये केला गेला.
आता जो घटक विकसित केला गेला आहे, तो अनेक वस्तू आपोआप दुरुस्त करू शकतो. जेव्हा एखाद्या वस्तुची या घटकाच्या मदतीने दुरुस्ती होते, तेव्हा त्या वस्तुचे तुकडे आपोआप जुळू लागतात, अशी या घटकाची संरचना करण्यात आली आहे.
या संशोधनात 2015मध्ये आयआयटी फेलोशिप मिळालेले प्रा. सी. मल्ला रेड्डी आणि त्यांच्या पथकाने हा विशेष शोध लावला आहे.





























































