
सामना प्रतिनिधी । माऊंट मॉनगनुई
पहिल्या सामन्यात धडाकेबाज शतक झळकावणार्या स्मृती मंधानाने मंगळवारी येथे झालेल्या आयसीसी महिला चॅम्पियनशिपमधील दुसर्या लढतीत नाबाद 90 धावांची तुफानी खेळी साकारत हिंदुस्थानच्या महिला संघाला न्यूझीलंडवर आठ गडी व 88 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवून दिला.
स्मृती मंधानाला कर्णधार मिताली राजच्या नाबाद 63 धावांची मोलाची साथ लाभली. हिंदुस्थानच्या महिला संघाने या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडीही घेतली. न्यूझीलंडकडून मिळालेल्या 162 धावांचा पाठलाग करताना स्मृती मंधाना व मिताली राज या जोडीने तिसर्या विकेटसाठी नाबाद 151 धावांची भागीदारी रचली. स्मृती मंधानाने अवघ्या 83 चेंडूंत नाबाद 90 धावा फटकावल्या. मिताली राजने दोन षटकार व चार चौकारांसह नाबाद 63 धावा केल्या.

























































