इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातील 177 प्रवासी बचावले, तांत्रिक बिघाडामुळे चंदीगड विमानतळावर थांबवले विमान

एअर इंडियाच्या विमान अपघाताची भीषण घटना ताजी असतानाच आज इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचा अपघात टळल्याची घटना समोर आली. तांत्रिक बिघाडाची तक्रार आल्यानंतर आज चंदीगड विमानतळावर उड्डाण रद्द करण्यात आले आणि विमान जागीच थांबवण्यात आले. प्राथमिक तपासणीत तांत्रिक बिघाड झाल्याची पुष्टी झाल्यानंतर उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विमानातील तब्बल 177 प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. हे विमान इंडिगो एअरलाइन्सचे होते. ते चंदीगडहून लखनऊला जाण्यासाठी सज्ज होते. विमानात नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला याबद्दल विमानतळ प्राधिकरणाने किंवा विमान कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. इंडिगो एअरलाइन्सचे या महिन्यातच हे चौथे विमान आहे, ज्यात अशाप्रकारे तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता डीजीसीए याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे.

नेमके काय घडले?

इंडिगोचे चंदीगडहून लखनऊला जाणारे विमान 6 ई-146 आज सकाळी साडेआठ वाजता उड्डाण घेणार होते. उड्डाणापूर्वी करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान वैमानिकाला तांत्रिक समस्या आढळली. त्यानंतर विमानतळ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षित विमानातून उतरवण्यात आले. विमान कंपनीने तिकिटांचे पैसेही परत केले आहेत.