
भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि मध्य प्रदेशात विधानसभेचे उमेदवार कैलास विजयवर्गीय यांच्या समस्या वाढत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी दिलेल्या प्रतीज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन प्रकरणांचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. लपवलेल्या प्रकरणांमध्ये एक पश्चिम बंगालमधील बलात्कार प्रकरण आहे. तर दुसरे प्रकरण छत्तीसगडमधील आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसने त्यांना घेरण्याची तयारी केली आहे.
पश्चिम बंगालमधील प्रभारी असलेल्या विजयवर्गीय यांच्यावर एका महिलेने दुष्कर्म आणि पैसे लुबाडण्यासह काही गंभीर आरोप केले आहेत. याबाबतचा खटला सुरू आहे. तसेच थच्चीसगडमधील दुर्ग प्रकरणात ते फरार आहेत. विजयवर्गीय यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील पाच प्रकरणांचा उल्लेख केला आहे. मात्र, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधील या प्रकरणांचा उल्लेख केलेला नाही.
या प्रकरणी इंदूर विधानसभा क्रमांक 1 चे काँग्रेसचे उमेदवार संजय शुक्ला यांचे प्रस्तावर दीपू यादव, वकील रवींद्र सिंह छाबडा यांनी निवडणूक आयोगाकडे याची तक्रार नोंदवली आहे. तसेच त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी केली आहे. आपली प्रतीमा मलीन होऊ नये, म्हणूनच त्यांनी या प्रकरणांचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे त्यांची उनेदवारी रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
आपण असल्या तक्रारीबाबत उत्तर देणार नाही. ही कोणती प्रकरणे आहेत, त्याची माहितीही नाही. छत्तीसगडचे प्रकरण 1990 चे आहे. त्यानंतर आपण विविध 7 निवडणुका लढलो आहोत. त्यावेळी हा मुद्दा आला नाही. त्यामुळे अशी राजकारणाला आपण घाबरत नाही, तसेच याबाबतच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची गरजही नाही, असे सांगत विजयवर्गीय यांनी प्रश्नाला बगल दिली.
























































