औद्योगिक वसाहतही 31 मार्चपर्यंत बंद,  बजाजसह सर्व कंपन्यांचा लॉकडाऊन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन, चितेगाव, वाळूज यासह शहर व परिसरातील सर्व औद्योगिक वसाहतींमधील सर्वच लहान-मोठ्या कंपन्यांचा 31 मार्चपर्यंत संपूर्ण बंद राहणार आहे. काल रात्री बजाज व्यवस्थापनाने बंदचा निर्णय घेतला व तो इतर सर्व संबंधित कंपन्या व औद्योगिक संस्था संघटनांना कळविला. त्यामुळे बजाजला यंत्रसामुग्रीचा पुरवठा करणार्‍या सर्व लहान-मोठ्या कंपन्यांनी काल रात्रीच आपापल्या कंपन्यांना टाळे लावले.

बजाज कंपनीचे फॅक्ट्री मॅनेजर अभय पत्की यांनी सर्व कामगारांना उद्देशून लेखी पत्रच जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोना आजाराच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने जिल्ह्यातील सर्व उद्योग संस्था 23 मार्चपासून बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे बजाजचा वाळूज येथील प्लान्ट 23 मार्चपासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात फक्त अत्यावश्यक विभागातील मोजके कामगार, कर्मचारी आदेशानुसार कामावर येतील. या परिस्थितीचा 30 मार्च रोजी आढावा घेऊन पुढील सूचना देण्यात येतील.

बजाज बंद राहणार असल्यामुळे बजाजच्या निर्णयावर अवलंबून असलेल्या 350 कंपन्यांनीही आपल्या कंपन्या तात्काळ बंद केल्या. बजाजशिवाय औद्योगिक वसाहतीतील सर्व मोठ्या कंपन्या, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लहान कंपन्या आणि कामगारांच्या बसेस (कंपन्यांतील अत्यावश्यक सेवा वगळता) इतर सर्व औद्योगिक सेवा बंद राहणार आहेत.

वाळूज मधील फार्मासिटीकल 13 कंपन्या सुरु

औद्योगिक क्षेत्रातील जवळपास सर्वच कंपन्या बंद होत्या. मात्र औषधीचे उत्पादन करणार्‍या तसेच रुग्णालयातील विविध उपकरणे तयार करणार्‍या मायलॉन, अमरी इंडिया, जॉन्सन ऍण्ड जॉन्सन, ईडीको रिमेडिज,  वोखार्ड,  युरोलाईफ,  हॉस्पीरा, सिडलर रिमेडीज, रुबीकॉन फॉर्म्युलेशन, एफडीसी, इप्का लेबॉरिटरीज प्लॉट नंबर एच-4, व जी-7, श्रेया लाईफ सायन्सेस या 13 कंपन्यातील कामकाज सुरळीतपणे सुरु होत्या.