
देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीज वापरात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवडय़ात विजेच्या एकूण मागणीत तब्बल साडेअकरा टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत 55.37 अब्ज युनिट एवढय़ा विजेचा वापर झाला आहे. मागील वर्षी याच काळात 49.67 अब्ज एवढा वीज वापर होता, असे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
ऊर्जा मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात देशात 97 अब्ज युनिट एवढा विजेचा वापर झाला होता. त्या तुलनेत गेल्या पंधरा दिवसांतील विजेच्या वापरातील दोन अंकांची वाढ पाहता वार्षिक वापरताही वाढ होणार असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर विजेच्या मागणीत झपाटय़ाने घट झाली होती. त्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उद्योगधंदे, दुकाने सुरू झाल्याने विजेचा वापर वाढला असल्याचे दिसत आहे.
सहा महिने विजेच्या मागणीत घसरण
देशात 25 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पुढील सहा महिने म्हणजे ऑगस्टपर्यंत विजेच्या मागणीत घसरण झाली आहे. वार्षिक वीज वापराच्या तुलनेत मार्चमध्ये 8.7 टक्क्यांनी विजेची मागणी घटली आहे. एप्रिलमध्ये 23.2 टक्के, मेमध्ये 14.9 टक्के, जूनमध्ये 10.9 टक्के, जुलैमध्ये 3.7 टक्के, ऑगस्टमध्ये 1.7 टक्क्यांची घट झाली आहे.






























































