झटपट पैशांसाठी बहिणीच्या घरी केली चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झटपट पैशांसाठी बहिणीच्या घरी चोरी करणाऱ्या भावासह त्याच्या मित्राला मेघवाडी पोलिसांनी अटक केली. मिर्झा आझम बेग आणि अलिमुद्दीन सय्यद अशी त्यांची नावे आहेत. त्याच्या दोन साथीदारांचा मेघवाडी पोलीस शोध घेत आहेत.

तक्रारदार गृहिणी मेघवाडी परिसरात राहतात. दीड महिन्यापूर्वी मिर्झा हा त्याच्या चार मित्रांना घेऊन त्याच्या बहिणीच्या घरी आला. घरी आल्यावर दुपारचे जेवण झाल्यावर तक्रारदार या झोपल्या. त्याचा फायदा घेऊन मिर्झा आणि त्याच्या साथीदाराने 5 तोळे सोने चोरुन तिथून निघून गेले. सायंकाळी महिलेने कपाट उघडले असता सोने गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरी झाल्याप्रकरणी महिलेने मेघवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हय़ाची नोंद केली. वरिष्ठ निरीक्षक संजीव पिंपळे यांच्या पथकातील उपनिरीक्षक भूषण मोरे आणि पथकाने तपास सुरू केला. चोरी झाली त्या दिवशी मिर्झा हा त्याच्या चार मित्रांसोबत घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी मिर्झा आणि त्याच्या साथीदाराची माहिती काढली. चोरीनंतर पोलिसांनी पकडू नये म्हणून त्या दोघांनी त्यांचे फोन नंबर बंद करून ठेवले होते. ते सर्वजण हैदराबादला असल्याचे समजताच पोलिसांचे पथक हैदराबादला गेले. हैदराबाद येथून पोलिसांनी मिर्झा आणि अलिमुद्दीनला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्या दोघांनी चोरीची पोलिसांना कबुली दिली. चोरीच्या गुन्ह्यात त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मिर्झा आणि त्याच्या साथीदाराने चोरीचे सोने नेमके कोणाला दिले याचा तपास पोलीस करत आहेत.