अमेरिकेतून सर्व हिंदुस्थानींना बाहेर काढा, खासदाराची वादग्रस्त टिप्पणी

हिंदुस्थानातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता अमेरिकेतील फ्लोरिडा काऊंसिलचे सदस्य म्हणजेच तेथील खासदार शँडलर लँगविन यांनी हिंदुस्थानी नागरिकांसंबंधी वादग्रस्त विधान केले आहे. अमेरिका ही केवळ अमेरिकन नागरिकांसाठी आहे. त्यामुळे अमेरिकेत असणाऱ्या सर्व हिंदुस्थानी नागरिकांना अमेरिकेतून बाहेर काढण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करून खासदार शँडलर लँगविन यांनी ही मागणी केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, आज माझा वाढदिवस आहे आणि मला हेच वाटते की, डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व हिंदुस्थानी नागरिकांचा व्हिसा रद्द करावा. त्यांना तत्काळ अमेरिकेतून निर्वासित करावे. अमेरिका ही केवळ अमेरिकन नागरिकांसाठी असायला हवी, असे म्हटले. दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, जर कोणी अमेरिकन नागरिक हिंदुस्थानी नागरिकाला कामावर ठेवत असेल तर हिंदुस्थानी नागरिक हिंदुस्थानात पैसा पाठवतो. हिंदुस्थानातील निवडणुकीत हिंदुस्थानचा प्रचार करतो. अमेरिकेतील सरकारी इमारतीवर हिंदुस्थानी ध्वज फडकवण्याचा आग्रह धरतो. त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आपल्या लष्करात सेवा देण्यास तयार नाही. त्यांचे सर्व प्रेम त्यांच्या देशासाठी आहे. त्यामुळे त्यांना अमेरिकेतून निर्वासित करायला हवे.

विधानावरून गदारोळ

खासदार शँडलर लँगविन यांच्या या पोस्टने एकच खळबळ उडाली आहे. अनेकांनी या पोस्टचा जाहीर निषेध केला आहे. हिंदूज फॉर ह्युमन राइट्सने एक खुले पत्र लिहिले असून फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डेसिंटिस यांच्याकडे मागणी केली आहे की, लँगविन यांना पदावरून हटवण्यात यावे. एशियन अमेरिकन हॉटल ऑनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष भरत पटेल यांनीही या विधानाचा निषेध केला आहे. लँगविन यांनी हिंदुस्थानी नागरिकांबद्दल जे काही म्हटले आहे, ते अत्यंत चुकीचे आहे, असे अमेरिकन बिजनेस असोसिएशन अँड चेंबरचे अध्यक्ष प्रशांत पटेल यांनी म्हटले.