
दरोडा टाकून लूटमार करण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य दरोडेखोरांना सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये पोलिसांना धारदार शस्त्र व सोन्या-चांदीचा ऐवज आढळला आहे. हे दरोडेखोर विजापूर रोडवरील एका सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. जयलिंग कैलास काळे (वय 33), अमित महादेक ऊर्फ शंकर चव्हाण (वय 36, दोघे रा. लिंपणगाव, धनगरवस्ती, ता. श्रीगोंदा, जि. नगर), सुनील विठ्ठल पिंगळे (वय 48, रा. गुरुधनुरा, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर), रवींद्र धनसिंग पवार (वय 45, रा. कुमार तळ, ता. जामखेड, जि. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे असून, दोन दरोडेखोर पळून गेले आहेत.
गुन्हे शाखेच्या पोलीस रेकॉर्डवरील संशयित चोरटय़ांचा शोध घेत होते. काही संशयित हे बॉम्बे पार्कजवळील एका मोकळ्या जागेत हत्यारांसहित तोंडावर कापड बांधून थांबले आहेत, अशी माहिती पोलिसांनी मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन या सर्व संशयित आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, हवालदार दिलीप नागटिळक, विद्यासागर मोहिते, गणेश शिंदे, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, आरती यादव, रफिक इनामदार, विजय निंबाळकर आदींनी या कारवाईत भाग घेतला.





























































