
सामना ऑनलाईन । मुंबई
बासरीवादक अमर ओक आपल्या बासरीच्या स्वरांतून महादेवांची उपासना करतात
आपलं आवडतं दैवत? – आवडतं दैवत शंकर आणि संगीत क्षेत्रातील पंडित हरिप्रसाद चौरसिया.
त्यांचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं? – त्यांचं जेवढं कौतुक करेन तेवढं थोडं आहे. माझ्या कार्यक्रमात ते येतात तेव्हा यथोचित सत्कार करतोच.
संकटात ते तुम्हाला कशी मदत करतात असं वाटतं? – महादेव मानसिक बळ देतो. कुठल्याही परिस्थितीत संतुलित, स्थिर राहणं हेच महत्त्वाचं असतं.
कला आणि भक्तीची सांगड कशी घालता? – या दोन्हीचा खूप जवळचा संबंध आहे. संगीत क्षेत्रातील कलावंत खूप भाग्यवान आहोत. कारण हा परमेश्वर प्राप्तीचा छोटा मार्ग आहे. हीच भक्ती आहे. कला आणि भक्ती वेगळी नाही. कलेची उपासना योग्य दिशेने करत राहिलं की वेगळी भक्ती करायला हवी असं नाही.
तुमच्यातली कला साकारण्याकरिता त्यांची कशी मदत होते? – हो, होतेच. दैवतेची उपासना करताना आतून आपण स्थिर होतो. पंचप्राण आपापल्या जागी स्थिर होतात तेव्हा कलेत प्रगती व्हायला मदत होते. त्यातूनच नवनिर्मिती होते. यासाठी भक्ती किंवा साधनेचा उपयोग होतो.
आवडत्या दैवताला प्रार्थना केल्यावर यश मिळालंय असा प्रसंग… – माझी आई रुग्णालयात होती, तेव्हा कोणत्याही क्षणी तिचं काहीही होण्याची शक्यता होती. त्यावेळी महादेवाचा धावा केला, जप केला आणि पुढे सात दिवस ती होती. ते सात दिवस त्यांनी आम्हाला दिले.
त्यांच्यावर रागावता का? – हो, तो आपला हक्कच असतो. नंतर कळतं की, जे काही सगळं चाललंय ती त्याची सत्ता आहे. जे घडतं ते चांगल्यासाठी असतं.
देव तुमचे लाड कसे पुरवतो? – जे माझ्या आयुष्यातील अनमोल क्षण आहेत ते त्यानेच दिले आहेत. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी सर्वांसमोर भरभरून कौतुक केलं. हरिप्रसाद चौरसिया, लक्ष्मीकांत प्यारेलाल, आशा भोसले किंवा संगीत कार्यक्रमांमध्ये आलेले परीक्षक कौतुक करतात.
देवतेचं कोणतं स्वरूप आवडतं? – निर्गुण स्वरूप आवडतं. फक्त अनुभूती यावी असं वाटतं.
नियमित उपासना कशी करता?- यामध्ये घरची देवपूजा, दररोज 15 मिनिटं देवासाठी बासरी वाजवतो. मुकुंद महाराज यांनी मला देवासाठी रोज बासरी वाजवायला सांगितली आहे. देवासाठी वाजवतोय हा भाव मनात ठेवून बासरी वाजवतो.
त्याच्यापाशी काय मागता? – जेव्हा मागायची वेळ येते तेव्हा हाच विचार मनात येतो की, जे माऊलींनी मागितलं ‘जो जे वांछील तो ते लाहो’ सगळ्यांचे कल्याण होवो. स्वतःसाठी मागायचं असेल तर शास्त्राrय संगीत मला छान वाजवता यावं असं मागतो.




























































