
> > आशिष बनसोडे
जमाना ऑनलाइनचा. त्यामुळे ऑनलाइन जेवण मागवणे हे स्टेटस सिम्बॉल बनले आहे. मोबाईल ऍपवर मेन्यू सिलेक्ट केला की नंतरच्या अर्ध्या तासात डिलिव्हरी बॉय जेवणाचे पार्सल घेऊन दारात हजर होतो. आधी हॉटेलमध्ये ऑर्डर देऊन जेवण मागवले जायचे. हॉटेलचे कर्मचारी सायकलवरून ऑर्डरची घरपोच डिलिव्हरी द्यायचे. पण आता खाद्यपदार्थ, जेवणाची ऑनलाइन ऑर्डर देणाऱयांना त्यांची ऑर्डर झटपट घरपोच देण्यासाठी काही कंपन्या बाजारात उतरल्या आहेत. पूर्वी मॅकडोनाल्ड कंपनीचे दुचाकीस्वार 30 मिनिटांच्या आत पिझ्झाची ऑर्डर घरपोच जाऊन देताना दिसायचे. पण आता झोमॅटो, स्विगी, उबेर अशा कंपन्यादेखील ही कामे करू लागली आहेत. मात्र या कंपन्यांच्या दुचाकीस्वारांचा ना ना तऱहेचा उपदव्यापही सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आला. शिवाय झटपट ऑर्डर देण्याच्या नादात त्यांच्याकडून वाहतूक नियमांचे देखील उल्लंघन होऊ लागले. त्यामुळे हे डिलिव्हरी बॉईज अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच वाहतूक पोलिसांच्या ‘रडार’वर आले आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागा (एफडीए)च्या नियमानुसार ऑनलाइन जेवणाची डिलिव्हरी करणाऱया प्रत्येक कर्मचाऱयाकडे परवाना असणे बंधनकारक आहे. पण हल्ली बाजारात आलेल्या ऑनलाइन खाद्यपदार्थांची डिलिव्हरी देणाऱया कंपन्याच्या कर्मचाऱयांकडे तो परवाना नसल्याने एफडीएने त्याबाबत आता ठोस भूमिका घेतली आहे. याबाबत एफडीएचे सहआयुक्त (अन्न) शैलेंद्र आढाव यांच्याशी केलेली बातचीत.
आताच परवाना घेण्याची सक्ती का करण्यात आली?
– अन्न सुरक्षा व मानके कायदा नंबर 6 नियम व नियमन 2011 अंतर्गत परवाना घेणे, नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे परवाना घेण्याबाबत आताच सक्तीचे केलेले नाही. तर पूर्वीपासून परवाना घेणे बंधनकारक आहे. बऱयाच हॉटेल, दुकान मालकांनी तसेच त्यांच्याकडे काम करणाऱया कर्मचाऱयांनी परवाने घेतलेले आहेत. आता आम्ही नव्याने पुढे आलेल्या खाद्यपदार्थांची ऑनलाइन डिलिव्हरी देणाऱयांना परवाना तत्काळ काढून घेण्याची सूचना केली आहे.
परवाना नसेल तर काय कारवाई होईल?
– परवाना नसेल तर संबंधितावर कठोर कारवाईचे प्रावधान कायद्यात आहे. कलम 63 प्रमाणे परवाना न काढता ते काम करणाऱयास पाच लाखांचा दंड आणि सहा महिन्यांचा कारवास अशा शिक्षेची तरतूद आहे. कोणाचाही मनमानी कारभार चालू नये यासाठी ऑनलाइन खाद्यपदार्थ वितरीत करण्याच्या कामासाठी एफडीएचा परवाना असणे गरजेचे असून तो सर्वांनी तत्काळ काढला पाहिजे.
परवान्यासाठी कोणती माहिती आवश्यक आहे?
– संबंधिताचे फोटो, त्याचे संपूर्ण नाव, राहण्याचा पत्ता, आधारकार्डची माहिती परवाना काढण्यासाठी आवश्यक आहे. शिवाय त्यानंतर आम्ही संबंधिताची आरोग्य तपासणी करतो. त्याला कोणता संसर्गजन्य किंवा त्वचेचा आजार नाही ना याची चाचपणी केली जाणार आहे. जेणेकरून खाद्यपदार्थ घेऊन जाणाऱयांमुळे ऑर्डर देणाऱयांना कोणताही त्रास होता कामा नये.
परवान्याव्यतिरिक्त आणखी काही भूमिका…
– रायडर्सने स्वच्छ राहणे, हॉटेलमधून घेतलेले पॅकबंद अन्न आहे तसे संबंधितांना जाऊन देणे, रस्त्यात मध्येच खाद्यपदार्थ खोलून बघू नये याबाबतच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. याबाबत आम्ही विविध माध्यमातून वारंवार सूचना देत आहोत.
मुंबई वाहतूक पोलिसांनीदेखील या ऑनलाइन खाद्यपदार्थांची डिलिव्हरी देणाऱया रायडर्सना आपल्या रडारवर आणले आहे. पोलिसांनी त्यांना लक्ष्य करण्यामागचे कारण तसे वेगळे आणि महत्त्वाचे आहे. याबाबत सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार यांच्याशी केलेली चर्चा.
अलीकडे रायर्डसविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली आहे…
– होय. झोमॅटो, स्विगी, उबेर या ऑनलाइन खाद्यपदार्थ घरपोच देणाऱया कंपनीचे रायडर्स रस्त्यावर सर्रास दिसतात. झटपट डिलेव्हरी देण्याच्या नादात ते रायडर्स वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. त्यांच्याविरोधात वारंवार अनेक तक्रारी येऊ लागल्यामुळे आम्हाला कारवाईची मोहीम हाती घ्यावी लागली आहे.
रायडर्सविरोधात नेमक्या कोणत्या तक्रारी येतात?
– वेळेचे गणित जुळविण्याच्या नादात रायडर्स भरधाव दुचाकी चालवतात. अनेकदा सिग्नल जंप करतात, बऱयाचदा विरुद्ध दिशेने गाडी चालवितात, हेल्मेट घालत नाहीत, अशा स्वरूपाच्या तक्रारी त्यांच्याविरोधात वाढत होत्या.
रायडर्सने नियम पाळावेत यासाठी आपण काय पाऊल उचलले आहे?
– आम्ही या ऑनलाइन कंपन्याच्या बेशिस्त रायडर्सवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जे सापडतात त्यांचे आम्ही समुपदेशन करतो. त्याच्याबरोबर संबंधित कंपनीच्या अधिकाऱयांनादेखील बोलावून समज देतो. पण जो रायडर्स वारंवार कायदा मोडताना सापडेल त्यांचे काम कंपनीने बंद करावे असा इशारादेखील आम्ही दिला आहे. तसेच आम्ही इतक्या वेळेत घरपोच डिलिव्हरी देऊ असे कोणतेही आश्वासन कंपन्यांनी नागरिकांना देऊ नये, असेही कंपन्यांना सांगण्यात आले आहे.
रायडर्सना काही सूचना...
– झटपट ऑर्डरची डिलिव्हरी देण्याच्या नादात सुसाट दुचाकी चालवू नका. तुमचा आणि इतरांचा जीव मौल्यवान आहे. त्यामुळे स्वतŠसह दुसऱयांचा जीव धोक्यात येईल असे वाहन चालवू नका. वाहतुकीचे नियम पाळा आणि सहकार्य करा असे आमचे आवाहन आहे.





























































