
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
निवडणुकीत पारदर्शकेचा अभाव आणि दोन संघटना यामुळे तिरंदाजी असोसिएशन ऑफ इंडियावर आर्चरी जागतिक तिरंदाजी फेडरेशनकडून निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली. तिरंदाजी असोसिएशन ऑफ इंडियाचा भरकटलेला बाण निशाण्यावर येण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. जागतिक तिरंदाजी फेडरेशनने हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशनशी समन्वय साधून पाच जणांच्या समितीची स्थापना केली असून आता हीच समिती हिंदुस्थानी तिरंदाजीला तारणार आहे. निलंबनाची शिक्षा मागे घेण्यासाठी ही समिती प्रयत्नशील असणार आहे.
समितीवरील जबाबदारी
तिरंदाजी असोसिएशन ऑफ इंडियाच्या नव्या निवडणुकीसाठी ‘रोडमॅप’ तयार करणे. केंद्रीय क्रीडा मंत्रालय व जागतिक तिरंदाजी फेडरेशन यांच्या नियमांना अनुसरून निवडणूक घेणे. आशियाई पॅरा चॅम्पियनशिप व आशियाई चॅम्पियनशिपसाठी खेळाडूंची निवड चाचणी घेणे. पुढल्या वर्षी होणाऱया ऑलिम्पिकसाठी खेळाडूंच्या निवड प्रक्रियेवर लक्ष देणे.
समितीतील व्यक्ती खालीलप्रमाणे
राजीव मेहता (सहसचिव, आयओए)
आर. राजगोपाल (केंद्रीय क्रीडा मंत्रालय)
बी. व्ही. पी. राव
वीरेंद्र सचदेवा
(टीप – पाचवी व्यक्ती ही हायकोर्टाकडून निवडण्यात येणार आहे. ती व्यक्ती या समितीची चेअरमन असेल).
आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाची काही महिन्यांपूर्वी निवडणूक झाली. कोर्टाकडून नेमण्यात आलेल्या इलेक्शन ऑफिसरकडून ही निवडणूक पार पडली. पण त्याने स्वतः मेंबरशिप देऊन ही निवडणूक पूर्ण केली. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक घेण्यात आली. मात्र या निवडणूक प्रकियेवर संशय घेण्यात आला. दोन संघटनांतील वादामुळे खेळाडूंना फटका बसत आहे.

























































