IPL 2020 – चेन्नईचा खेळ खल्लास?

प्रत्येक मोसमात प्ले ऑफमध्ये धडक मारणारा… आठ वेळा अंतिम फेरीत प्रवेश करणारा… अन् तीन वेळा चॅम्पियन ठरलेला… ही सक्सेसफुल स्टोरी महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जची. यंदाच्या मोसमात मात्र या संघाला प्रतिमेला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. राजस्थान रॉयल्सने सोमवारी चेन्नई सुपरकिंग्जला पराभूत केले आणि यंदाच्या मोसमातील त्यांच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना सुरुंग लागला. दहा लढतींमधून फक्त तीन लढती जिंकणाऱया चेन्नई सुपरकिंग्जने उर्वरित चार लढतींमध्ये विजय मिळवल्यानंतरही त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे या जर तरच्या समीकरणामुळे अवलंबून असलेल्या चेन्नई सुपरकिंग्जचा या मोसमातील खेळ खल्लास झालाय असे म्हटले तरी यावेळी वावगे ठरणार नाही.

अंधुक आशा

चेन्नई सुपरकिंग्जला प्ले ऑफमध्ये पोहचण्याची अंधुक आशा आहे. या संघाने गेल्या मोसमातील साखळी फेरीच्या गुणतालिकेवर नजर टाकल्यास त्यांचाही आत्मविश्वास नक्कीच उंचावेल. 2019 सालातील आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने 18 गुणांसह पहिला, चेन्नई सुपरकिंग्जने 18 गुणांसह दुसरा आणि दिल्ली कॅपिटल्सनेही 18 गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला होता. अर्थात या तिन्ही संघांचे गुण समान असले तरी नेट रनरेटमुळे हे तीन क्रमांक ठरवण्यात आले होते. या मोसमात प्ले ऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ होता सनरायझर्स हैदराबाद. या संघाने अवघ्या सहा विजयासह प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता. कोलकाता नाईट रायडर्स व किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांनीही 12 गुण मिळवले होते. पण सनरायझर्स हैदराबादने सरस नेट रनरेटच्या जोरावर बाजी मारली होती. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्जला पुढील लढतींमध्ये चांगली कामगिरी करून आशा बाळगता येणार आहे.

वयस्कर खेळाडू अन् यूएईतील वातावरण

चेन्नई सुपरकिंग्ज संघाला यंदा वयस्कर खेळाडूंच्या सुमार कामगिरीचा फटका बसलाय. हे दस्तुरखुद्द प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही मान्य केले आहे. शेन वॉटसन, महेंद्रसिंग धोनी या वयस्कर खेळाडूंना सातत्याने निराशेचा सामना करावा लागला. तसेच यूएईतील खेळपट्टी व वातावरणाचाही या संघाला फटका बसलाय. आतापर्यंत हा संघ पीयूष चावला, रवींद्र जाडेजा, कर्ण शर्मा या फिरकीवीरांना अवलंबून होता, पण यूएईत या फिरकी गोलंदाजांना आपला ठसा उमटवता आलेला नाही. तसेच फलंदाजीतील क्रम वारंवार बदलण्याची योजनाही फसलीय. वारंवार संधी देऊनही अपयशी ठरणारा केदार जाधव, ड्वेन ब्राव्होची दुखापत या बाबींचाही संघावर फरक पडलाय. एकूणच काय सर्वच बाबतीत हा संघ सपशेल अपयशी ठरलाय.

आपली प्रतिक्रिया द्या