IPL ला दुखापतींचे ग्रहण; भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रानंतर आता KKR चा स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यूएईमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेतून अनेक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर फेकले जात आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा (DC) दिग्गज फिरकीपटू अमित मिश्रा, सनरायझर्स हैद्राबादचा (SRH) मिशेल मार्श व भुवनेश्वर कुमार यांच्यानंतर आता कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाच्या खेळाडूला दुखापत झाली असून यामुळे तो स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

केकेआरचा वेगवान गोलंदाज आणि आयपीएलमध्ये सहभागी होण्याचा मान पटकावणारा अमेरिकन खेळाडू अली खान यंदाच्या सीझनमध्ये खेळताना दिसणार नाही.
दुखापतीमुळे तो स्पर्धेला मुकणार आहे. मात्र त्याला कोणती दुखापत झाली आहे, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

विशेष म्हणजे अली खान याला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज हॅरी गुर्ने याच्या जागी पर्यायी खेळाडू म्हणून संघात स्थान मिळाले होते. कॅरेबियन लीगमध्ये चांगली कामगिरी केल्याने त्याला केकेआरने आपल्या संघात घेतले होते. मात्र आता एकही सामना न खेळता तो देखील स्पर्धेतून बाहेर फेकला गेल्याने दोन वेळच्या विजेत्या केकेआर संघापुढं नवीन आव्हान उभे राहिले आहे.

‘आयपीएलमध्ये सहभागी झालेले अली खान पहिला अमेरिकन खेळाडू होता. मात्र दुर्दैवाने तो दुखापतग्रस्त झाला आहे. सरावाच्या दरम्यान त्याला ही दुखापत झाली आहे. यामुळे तो उर्वरित स्पर्धेसाठी उपलब्ध नसेल’, अशी माहिती देण्यात आली आहे.