असून अडचण, नसून खोळंबा! ‘या’ खेळाडूची 1 धाव पडली 10 लाखांना अन 1 विकेट 3 कोटी 50 लाखांना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) चे अखेरचे 2 सामने बाकी आहेत. आज होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद संघातील विजेता 10 नोव्हेंबरला मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. आयपीएल 2020 मध्ये अनेक अनकॅप आणि नवख्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, तर अनेक दिग्गज खेळाडू फेल राहिले. कोट्यवधी रुपये मोजून आपल्या संघात घेतलेल्या या खेळाडूंची कामगिरी सुमार राहिली. यातील एक नाव किंग्ज इलेव्हन पंजाबचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याचेही आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान यंदा साखळी फेरीतच संपुष्टात आले. के.एल. राहुल आणि मयांक अग्रवाल ही सलामीची जोडी चालत असताना मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेल याने मात्र निराशा केली. पंजाबच्या संघाने त्याला 10 कोटी 75 लाख मोजून आपल्या संघात घेतले होते.

ऑस्ट्रेलियाच्या या अष्टपैलू खेळाडूने आयपीएल 2020 मध्ये सर्वच क्षेत्रात निराशाजनक कामगिरी केली. फलंदाजी आणि गोलंदाजीत त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामुळे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी म्हण त्याला चपखल लागू होते.

1 धाव जवळपास 10 लाखांना

एकही विजेतेपद न पटकावणाऱ्या पंजाबने मोठ्या आशेने घेतलेल्या मॅक्सवेल याने 13 लढतीत फक्त 108 धावा केल्या. मॅक्सवेल याची सरासरी फक्त 15.42 एवढी राहिली. यादरम्यान त्याला एकही अर्धशतक ठोकता आले नाही. 10 कोटी 75 लाख मोजलेल्या मॅक्सवेल याची 1 धाव पंजाबला 9 लाख 95 हजारांना पडली.

षटकार ठोकण्याच्या नावाने बोंब

मोठ-मोठे फटके मारून सामन्याचे चित्र पालटवण्यात प्रसिद्ध असलेल्या मॅक्सवेल याची बॅट यंदा थंड राहिली. आयपीएल 2020 मध्ये त्याला एकही षटकार ठोकता आला नाही.

गोलंदाजीतही फेल

फलंदाजीत सुमार कामगिरी केलेला मॅक्सवेल गोलंदाजीतही फेल गेला. 13 लढतीत त्याने फक्त 3 बळी घेतले. त्यामुळे आगामी आयपीएलमध्ये पंजाबचा संघ त्याला रिलीज करण्याची शक्यता जास्त आहे.