
आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील प्ले ऑफमधील दुसरा व तिसरा संघ निश्चित झाला. दिल्ली कॅपिटल्स संघाने रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत करीत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. याच वेळी पराभूत झालेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघही प्ले ऑफसाठी पात्र ठरला. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नेट रनरेट कोलकाता नाईट रायडर्सपेक्षा चांगला ठरला. त्यामुळे त्यांचेही प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले. येत्या 5 नोव्हेंबरला अर्थातच गुरुवारी क्वॉलिफायर वन लढत रंगणार आहे. गुणतालिकेतील पहिल्या स्थानावरील मुंबई इंडियन्स व दुसऱया स्थानावरील दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये ही लढत पार पडेल.
नवव्यांदा अंतिम चारमध्ये
गतविजेत्या मुंबई इंडियन्सने या मोसमात आपला ठसा उमटवला आहे. या संघानेच सर्वप्रथम प्ले ऑफचे तिकीट बुक केले. आयपीएलच्या इतिहासावर नजर टाकल्यास मुंबई इंडियन्सचे या स्पर्धेतील वर्चस्व प्रकर्षाने दिसून येते. मुंबई इंडियन्सने नवव्यांदा या स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 व 2019 या सालांमध्ये जेतेपदावर मोहोर उमटवली आहे. 2010 साली या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
हरल्यानंतरही विराटची सेना पोहोचली
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा रविवारी झालेल्या लढतीत पराभव झाला. पण चांगल्या नेट रनरेटच्या जोरावर त्यांनी प्ले ऑफपर्यंत वाटचाल केली. दिल्ली कॅपिटल्सप्रमाणे या संघालाही या स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहा वेळा अंतिम चारमध्ये प्रवेश केलाय. या संघाला तीन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.
मालवणी तडका (दिल्ली-बंगळुरू लढत)
दिल्लीच्या आमंत्रणावर 152 चो बाजार… पाठलाग करून दिल्ली जिंकली… बंगळुरू हरली… तरी दोनय टीम शेवटच्या चारात पोचल्या… पण कोलकाता गॅसवर रव्हली…
बादल चौधरीच्या शब्दांत – ‘कोणाचे म्हशी आनी कोणाक उठाबशी…’
पाचव्यांदा धडक
दिल्ली कॅपिटल्स हा संघ सुरुवातीच्या काळात दिल्ली डेअरडेव्हिल्स या नावाने आयपीएलमध्ये सहभागी होत होता. या संघाने आतापर्यंत पाच वेळा अंतिम चारमध्ये धडक मारलीय. पण दिल्ली कॅपिटल्सला अद्याप एकदाही या स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही. या संघाने 2012 व 2019 सालामध्ये तिसरे स्थान पटकावले होते.




























































