IPL 2020 – शारजहामध्ये 449 धावांचा पाऊस, सॅमसन-तेवतियाच्या ‘त्सुनामी’ने पंजाबचे वादळ थोपवले

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) रंगात येऊ लागली असून रविवारी झालेल्या ‘सुपर संडे’ लढतीत शारजहामध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडला. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने दिलेले 223 धावांचे विशाल आव्हान राजस्थान रॉयल्सने पार केले आणि इतिहास रचला. राजस्थानच्या संघाने 19.3 षटकात 6 गडी गमावून 226 धावा चोपल्या आणि आयपीएल इतिहासातील सर्वात ‘रॉयल’ विजय मिळवला.

पंजाबच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 223 धावा केल्या. पंजाबकडून सलामीवीर मयांक अग्रवाल याने 50 चेंडूत 106 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याने 10 चौकार आणि 7 उत्तुंग षटकार ठोकले. मयांकला कर्णधार के.एल. राहुल याने 54 चेंडूत 69 धावा करत चांगली साथ दिली. अखेरच्या षटकात 8 चेंडूत 25 धावा करत निकोलस पूरन यानेही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आणि संघाल विशाल धावसंख्या रचून दिली.

डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला जोस बटलरच्या रूपाने पहिला धक्का बसला. पहिलाच सामना खेळणारा बटलर 4 धावा काढून बाद झाला. यानंतर आलेला स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन यांनी पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई करत नवव्या षटकात शतक फलकावर लावले. यादरम्यान अर्धशतक करणारा स्मिथ बाद झाला. यानंतर आलेल्या राहुल तेवतिया आणि सॅमसन यांनी 10 च्या सरासरीने धावा काढणे सुरू ठेवले. मात्र 17 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सॅमसन बाद झाला. तत्पूर्वी त्याने 42 चेंडूत 85 धावांची खेळी केली.

संजू सॅमसन बाद झाला तेव्हा राजस्थानला 23 चेंडूत 63 धावांची आवश्यकता होती आणि मैदानात धावांपेक्षा चेंडू खाल्लेला राहुल तेवतिया होता. सामना आता राजस्थानच्या हातून सुटला असे वाटत असतानाच तेवतियाने कॉटरेलच्या एकाच षटकात 5 षटकार ठोकत सामन्याचे चित्रच बदलून टाकले. तेवतिया 53 धावांवर बाद झाल्यानंतर जोफ्रा आर्चरने मोहम्मद शमीला 2 षटकार ठोकत चेंडू आणि धावा बरोबरीत आणल्या. अखेरच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर टॉम कुर्रन याने चौकार ठोकत राजस्थानला विजयी केले.

आपली प्रतिक्रिया द्या