
गेल्या मोसमात सातव्या स्थानावर घसरण झालेला चेन्नई सुपरकिंग्जचा संघ आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चॅम्पियन बनला. सलामीवीर फाफ डय़ुप्लेसिसची 86 धावांची जबरदस्त खेळी… इतर फलंदाजांची मोलाची कामगिरी… अन् शार्दुल ठाकूर, रवींद्र जाडेजा, जोश हेझलवूड, दीपक चहर या गोलंदाजांनी केलेली प्रभावी कामगिरी… याच पार्श्वभूमीवर चेन्नई सुपरकिंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला 27 धावांनी पराभूत केले आणि चौथ्यांदा आयपीएल जिंकण्याचा करिष्मा करून दाखवला. महेंद्रसिंग धोनीच्या संघाने 2018 सालानंतर ही स्पर्धा जिंकली. याप्रसंगी कोलकाता नाइट रायडर्सच्या तिसऱयांदा चॅम्पियन होण्याच्या स्वप्नांना सुरुंग लागला. त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. हे त्यांचे पहिलेच उपविजेतेपद ठरले.
दमदार सलामी
कोलकाता नाइट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. ऋतुराज गायकवाड व फाफ डय़ुप्लेसिस या चेन्नई सुपरपिंग्जच्या सलामी जोडीने 61 धावांची खणखणीत भागीदारी करताना आश्वासक सुरुवातही करून दिली. दोघांनी कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. दोघांची जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच सुनील नारायणच्या गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाड शिवम मावीकरवी झेलबाद झाला. त्याने 27 चेंडूंत एक षटकार व तीन चौकारांसह 32 धावा केल्या.
धोनी 300
चेन्नई सुपरपिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शिरपेचात शुक्रवारी मानाचा तुरा रोवला गेला. टी-20 क्रिकेटमध्ये 300 लढतींमध्ये कर्णधार म्हणून भूमिका बजावणारा महेंद्रसिंग धोनी हा जागतिक क्रिकेटमधील पहिलाच कर्णधार ठरला आहे. महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपरकिंग्जसाठी 214 लढतींमध्ये, रायझिंग पुणे सुपरजायंट्ससाठी 14 लढतींमध्ये आणि हिंदुस्थानसाठी 72 लढतींमध्ये नेतृत्व केले आहे. तसेच तो दहाव्यांदा आयपीएलची फायनल खेळला हे विशेष.
68 धावांची भागीदारी
फाफ डय़ुप्लेसिस व मोईन अली यांनी 68 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करताना चेन्नई सुपरपिंग्जला 3 बाद 192 धावा उभारून दिल्या. फाफ डय़ुप्लेसिसने 86 धावांची खेळी केली. मोईन अलीने तीन षटकार व दोन चौकारांसह नाबाद 37 धावा फटकावल्या. कोलकाता नाइट रायडर्सकडून सुनील नारायणने दोन फलंदाज बाद केले.
… अन् डाव गडगडला
चेन्नई सुपरपिंग्जकडून मिळालेल्या 193 धावांचा पाठलाग करणाऱया कोलकाता नाइट रायडर्सला 9 बाद 165 धावाच करता आल्या. शुभमन गिल (51 धावा) व व्यंकटेश अय्यर (50 धावा) या सलामीवीरांनी 91 धावांची भागीदारी करीत विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण शार्दुल ठाकूरने व्यंकटेश अय्यरला बाद करीत जोडी तोडली. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सचा डाव गडगडला. शार्दुल ठाकूरने 3, जोश हेझलवूड व रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी 2 व दीपक चहर व ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.




























































