कोण ठरणार किंग? चेन्नई-पंजाबमध्ये काँटे की टक्कर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जला पहिल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सकडून हार सहन करावी लागली. लोकेश राहुलच्या पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सवर रोमहर्षक विजय मिळवला. या दोन्ही लढतींमध्ये धावांचा पाऊस पडला. चेन्नई सुपरकिंग्जला 188 धावा फटकावल्यानंतरही पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब किंग्जने 221 धावा केल्यानंतरही अवघ्या चार धावांनी त्यांना विजय मिळवता आला. याचाच अर्थ दोन्ही संघांना यावेळी गोलंदाजांच्या फॉर्मची चिंता आहे. चेन्नई सुपरकिंग्ज-पंजाब किंग्ज यांच्यामध्ये उद्या होणाऱया लढतीत दोन्ही संघांतील गोलंदाजी विभागावरच साऱयांच्या नजरा असतील. तसेच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पुन्हा एकदा धावांचा पाऊस पडणार हेही निश्चित आहे.

गोलंदाजी विभागात बदल?

पंजाब किंग्जने सलामीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सला चार धावांनी हरवले, पण त्यांना कडवा संघर्ष करून हा विजय संपादन करता आला. कर्णधार लोकेश राहुल, ख्रिस गेल, दीपक हुडा यांनी फलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली. मयांक अग्रवाल, निकोलस पूरण, शाहरुख खान यांच्याकडूनही शानदार फलंदाजी करण्याची अपेक्षा बाळगली जात आहे, पण सध्या या संघासमोर गोलंदाजी विभागाचा प्रश्न उभा ठाकला आहे. मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग हे दोन गोलंदाज वगळता एकाही गोलंदाजाला पहिल्या लढतीत ठसा उमटवता आलेला नाही. त्यामुळे गोलंदाजी विभागात बदल होण्याची दाट शक्यता आहे. झाय रिचर्डसन, रायली मेरेडीथ व मुरुगन अश्विन यांच्यापैकी कोणाला अंतिम अकरामध्ये संधी मिळते हे पाहायला नक्कीच आवडेल. यावेळी रवी बिष्णोईसाठीही संघाचे दरवाजे उघडे करण्यात येऊ शकतात.

धावांचा पाठलाग करणे सोपे

वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत धावांच्या राशी उभारल्या गेल्या आहेत. लढतीच्या उत्तरार्धात मैदानात दवही पडते. त्यामुळे गोलंदाजांना गोलंदाजी करताना अडचण निर्माण होते. याच कारणामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतो. आतापर्यंतच्या लढतींवर नजर टाकल्यास धावांचा पाठलाग करणे या खेळपट्टीवर सोपे जात आहे हे प्रकर्षाने दिसून येत आहे. पण दोन संघांपैकी जो संघ अप्रतिम गोलंदाजी करील तोच बाजी मारेल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

खेळाडू फॉर्ममध्ये येण्याची आवश्यकता

पहिल्या लढतीत सुरेश रैनाने खणखणीत अर्धशतक झळकावले. तसेच सॅम करणने अखेरच्या षटकांमध्ये दमदार फलंदाजी केली, मात्र पराभवापासून दूर नेण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जचे सर्व खेळाडू फॉर्ममध्ये येण्याची आवश्यकता आहे. ऋतुराज गायकवाड, फाफ डय़ुप्लेसिस, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी व रवींद्र जाडेजा यांनी फलंदाजीत धमक दाखवायलाच हवी. तसेच सॅम करण, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, रवींद्र जाडेजा व मोईन अली यांना प्रतिस्पर्धी संघांतील फलंदाजांना बांधून ठेवावे लागेल.

आजची आयपीएल लढत

पंजाब किंग्ज-चेन्नई सुपरकिंग्ज मुंबई, रात्री 7.30 वाजता

उभय संघ

  • चेन्नई सुपरकिंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, के. एम. आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डय़ुप्लेसिस, इम्रान ताहीर, एन. जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एनगिडी, मिचेल सँटनर, रवींद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, सॅम करण, आर. साई किशोर, मोईन अली, के. गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी. हरी निशांत.
  • पंजाब किंग्ज – लोकेश राहुल (कर्णधार), मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, मनदीप सिंग, प्रबसिमरन सिंग, निकोलस पूरण, सरफराज खान, दीपक हुडा, मुरुगन अश्विन, रवी बिष्णोई, हरप्रीत ब्रार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, इशान पोरेल, दर्शन नळकांडे, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, झाय रिचर्डसन, शाहरुख खान, रायली मेरेडीथ, मोयसेस हेन्रीक्स, जलाज सक्सेना, उत्कर्ष सिंग, फॅबियन ऍलेन, सौरभ कुमार.