#IPL2021 कोलकात्यासमोर चेन्नईचे आव्हान, धोनी-मॉर्गन आमनेसामने

महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जला यूएईमध्ये पार पडलेल्या गेल्या मोसमात आयपीएलमध्ये सपाटून मार खावा लागला होता. मात्र सध्या हिंदुस्थानात सुरू असलेल्या आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपरकिंग्जचा संघ प्रतिमेला साजेशी कामगिरी करतोय.

मागील दोन लढतींत या संघाने पंजाब किंग्ज व राजस्थान रॉयल्स या दोन संघांना पराभवाची धूळ चारली आहे. महेंद्रसिंह धोनीच्या ब्रिगेडला आता विजयाची हॅटट्रिक साजरी करायची आहे. या संघाला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये उद्या होणाऱया लढतीत ओएन मॉर्गनच्या कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करावयाचा आहे. कोलकाता नाइट रायडर्सला मागील दोन लढतींत मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून हार सहन करावी लागलीय. त्यामुळे उद्या हा संघ चेन्नई सुपरकिंग्जचे आव्हान परतवून लावत या स्पर्धेत झोकात पुनरागमन करतोय का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

गिल, मॉर्गन, कार्तिकने पुढाकार घ्यावा

कोलकाता नाइट रायडर्ससाठी मागील दोन लढती निराशाजनक ठरल्या आहेत. नितीश राणा वगळता कोणालाही आतापर्यंत या स्पर्धेत आपला ठसा उमटवता आलेला नाही. शुभमन गिल, ओएन मॉर्गन, दिनेश कार्तिक व राहुल त्रिपाठी यांनी फलंदाजीत पुढाकार घेऊन संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मदत करायला हवी.

फलंदाजीत सुधारणा आवश्यक

चेन्नई सुपरकिंग्जने मागील दोन लढतींमध्ये विजय मिळवला असला तरी अद्याप त्यांचा फलंदाजी विभागाकडून अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. फाफ डय़ुप्लेसिस, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी यांनी फलंदाजीत सुधारणा करावीच लागणार आहे.

अष्टपैलू खेळाडूंकडून अपेक्षा

चेन्नई सुपरकिंग्जच्या संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. मोईन अली, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जाडेजा, सॅम करण व शार्दुल ठाकूर हे अष्टपैलू खेळाडू चेन्नई सुपरकिंग्जमध्ये ‘एक्स फॅक्टर’ची भूमिका बजावतात. यामुळे या संघात फलंदाजी तसेच गोलंदाजी विभाग खोलवर पसरलेला दिसतो. या सर्व खेळाडूंकडून आगामी लढतींमध्ये मोठय़ा अपेक्षा बाळगल्या जातील यात शंका नाही.

क्षेत्ररक्षणात अक्षम्य चुका

कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूंनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या लढतीत क्षेत्ररक्षणात अक्षम्य चुका केल्या. याचा फटका त्यांना बसला. यापुढे त्यांना क्षेत्ररक्षणात ढिलाई करून चालणार नाही. तसेच गोलंदाजी विभागात प्रसिध कृष्णा, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, हरभजन सिंग, आंद्रे रस्सेल यांनी प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांवर वर्चस्व गाजवायला हवे. अन्यथा या संघाचा पुढचा मार्ग खडतर ठरील.

आजची आयपीएल लढत

चेन्नई सुपरकिंग्ज-कोलकाता नाइट रायडर्स
मुंबई, रात्री 7.30 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या