IPL 2023: हातातोंडाशी आलेला सामना लखनौने गमावला, गोलंदाजीच्या जोरावर गुजरातचा 7 धावांनी विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लखनौच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियममध्ये केएल राहुल आणि हार्दिक पंड्या या दोन खास मित्रांच्या संघांमध्ये लढत पाहायला मिळाली. लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात झालेला हा सामना कमी धावसंख्येचा आणि रोमांचक होता. लखनौचा संघ जिंकता जिंकता हरला आणि या सामन्यात गुजरातने बाजी मारली.

या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात संघाने 20 षटकात 6 गडी गमावून 135 धावा केल्या. लखनौ संघासमोर 136 धावांचे लक्ष्य होते, परंतु लखनौ संघाला 20 षटकात केवळ 128 धावा करता आल्या आणि गुजरातने सामना 7 धावांनी जिंकला. पॉवरप्लेमध्येही लखनौ संघाने एकही विकेट न गमावता 53 धावा केल्या. अशा स्थितीतही संघ हरल्याने मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.

फलंदाजी करताना लखनौने दमदार सुरुवात केली. काईल मायर्स 24 धावा करून बाद झाला. कर्णधार केएल राहुलने शानदार अर्धशतक झळकावले. कृणाल पांड्याने 23 धावा केल्या. निकोलस पूरन स्वस्तात बाद झाला. अखेरच्या षटकात 68 धावा करून केएल राहुल बाद झाला. मार्कस स्टॉइनिसलाही विशेष कामगिरी करता आली नाही. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर आयुष बडोनी 8 धावा करून धावबाद झाला.

शुभमन गिलच्या रूपाने गुजरातला पहिला धक्का बसला. रिद्धिमान साहाने 47 धावा केल्या. अभिनव मनोहर 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. विजय शंकर स्वस्तात बाद झाला. हार्दिक पांड्याने शानदार अर्धशतक पूर्ण केले. तो 66 धावा करून बाद झाला. डेव्हिड मिलरची बॅट आज चालली नाही. राहुल तेवतियाला केवळ 2 धावा करता आल्या.