
आयपीएलमधील आव्हान संपले असले तरी आत्मसन्मानासाठी खेळत असलेली मुंबई इंडियन्स कोलकात्याला अडचणीत आणण्यासाठी सज्ज झाली आहे. सलग पराभवांमुळे खचलेली मुंबई आपला शेवट गोड करण्याच्या ध्येयाने पेटून उठली असून विजय हेच त्यांचे लक्ष्य आहे. प्ले ऑफसाठी झगडत असलेल्या कोलकात्याला नमवून प्ले ऑफसाठी चुरस वाढवण्याचेही मुंबईचे प्रयत्न राहतील. दुसरीकडे कोलकाता मुंबईला हरवून प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ बनण्यासाठी ईडन गार्डनवर उतरणार आहे.
सलग पराभवांमुळे मुंबई आयपीएलमधून सर्वप्रथम बाद झाला. पण हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करताना आपल्या पराभवाची मालिका खंडित केली. आता त्यांना तोच खेळ कायम ठेवायचा आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा हे दिग्गज पुन्हा एकदा आत्मसन्मानासाठी मुंबईसाठी उतरणार आहेत. बुमराचा फॉर्म कायम असला तरी रोहितला गेल्या पाच डावांत एकही दमदार खेळी करता आलेली नाही. त्यामुळे वर्ल्ड कपपूर्वी त्याला आपल्या षटकारबाजीचा कारनामा दाखवून क्रिकेटप्रेमी आणि संघांची चिंता दूर करावी लागणार आहे.





























































