हरभजनने श्रीसंतला कानफटवले, विराट-गंभीर मैदानातच भिडले; IPL इतिहासातील 5 सर्वात मोठे कांड

इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या हंगामाला 22 मार्च पासून सुरुवात होणार असून 25 मे रोजी अंतिम सामना खेळला जाईल. जेतेपदासाठी दहा संघांमध्ये यंदा एकूण 74 सामने खेळले जाणार आहेत. आयपीएलच्या नव्या हंगामाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना या स्पर्धेच्या इतिहासामध्ये अनेक वादग्रस्त घडामोडी घडलेल्या आहेत. अगदी पहिल्या हंगामापासून ते गतवर्षी झालेल्या हंगामापर्यंतचे पाच मोठे कांड आपण आज जाणून घेऊया…

आयपीएल सुरू करणाऱ्या फाउंडरलाच दाखवला बाहेरचा रस्ता

जगातील सर्वात मोठ्या लीगची सुरुवात ललित मोदी यांनी केली होती. मात्र पहिल्या तीन हंगामानंतर ललित मोदी यांनाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आयपीएल दरम्यान मोठा आर्थिक झोल केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स संघाच्या लिलावासह सोनी सोबत ब्रॉडकास्ट डिलमध्ये घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता आणि त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. सध्या ते फरार असून वानूआतू या देशाचे नागरिकत्व त्यांनी घेतले होते.

हरभजनने भर मैदानात श्रीसंतचा गाल रंगवला

आयपीएल 2013 चा हंगाम अनेक रोमांचक सामन्यांसह हरभजन आणि श्रीसंत यांच्या वादामुळेही चर्चेत राहिला. या हंगामातील बाराव्या लढतील मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे दोन संघ आमने-सामने होते. या लढतीत मुंबईचा पराभव झाला होता. यानंतर श्रीसंतने हरभजन दिसताच ‘हार्ड लक’ असे म्हटले. हे शब्द ऐकताच हरभजनचा पारा चढला आणि त्याने भर मैदानात श्रीसंतच्या कानाखाली लगावली. यावेळी श्रीसंतला अश्रू अनावर झालेले. या घटनेनंतर हरभजनला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता, एवढेच नाही तर बीसीसीआयने त्याला 5 वन डेतून वगळले होते.

जडेजावर एक वर्षाची बंदी

आयपीएलमध्ये खेळाडूंना फ्रेंचाईजी अनेक आकर्षक ऑफर देतात. या जाळ्यात अनेक खेळाडू अडकतातही. असाच एक प्रकार स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्यासोबत घडला होता. त्यावेळी जडेजा राजस्थान रॉयल्सकडून खेळायचा. मात्र आपल्या फ्रेंचाईजीला काहीही न सांगता तो मुंबई इंडियन्स सोबत करार करण्याच्या तयारीत होता. याबाबत राज्यस्थान रॉयल्स आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला कळाले. जडेजा दोषी आढळला आणि त्याच्यावर 1 वर्षाची बंदी घालण्यात आली.

IPL 2025 – संघात 3 कॅप्टन असल्याचा फायदा, 4 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे लक्ष्य! – हार्दिक पंड्या

फिक्सिंग आणि सट्टेबाजीमध्ये तीन खेळाडू दोषी

2013 चा हंगाम स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीमुळेही चांगलाच चर्चेत आला होता. त्यावेळी फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडू एस श्रीसंत, अंकित चव्हाण, आणि अजित चंदीला यांचे नाव समोर आले होते. या सर्वांवर खटला चालवला गेला आणि त्यात ते दोषी आढळले. त्यानंतर बीसीसीआयने तिन्ही खेळाडूंना आयपीएलमधून आजीवन बॅन केले. यासह सट्टेबाजीमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे मालक एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे मालक राज कुंद्रा दोषी आढळले होते. यामुळे राजस्थान आणि चेन्नईच्या संघावरही दोन वर्षाची (2016 व 17) बंदी घालण्यात आली होती.

सर्वात मोठा वाद, कोहली व गंभीर भिडले

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा वाद 2023 च्या हंगामामध्ये पाहायला मिळालेला. टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि विराट कोहली हे दोघेही मैदानातच भिडले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने लखनऊ सुपर जायंट्स संघाला 18 धावांनी हरवले होते. सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करताना विराट कोहली आणि लखनऊचा वेगवान गोलंदाज नवीन उल-हक यांच्यात वाद झाला. यात गंभीरने उडी घेतली. नंतर त्याचे आणि विराटचे खटके उडाले. अखेर दोन्ही संघांच्या खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली. बराच काळ या दोन्ही खेळाडूंमध्ये विस्तवही जात नव्हता.