
आयपीएलच्या 19 व्या हंगामाचा बिगुल वाजला असून क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पाच वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स यंदा नव्या जोमाने मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. केकेआर विरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी संघाची रणनीती आणि खेळाडूंच्या उपलब्धतेवर महत्त्वाची विधाने केली आहेत.
पहिल्या सामन्याचा ‘शाप’ मोडणार?
मुंबई इंडियन्सचा पहिल्या सामन्यातील रेकॉर्ड गेल्या काही वर्षांत फारसा चांगला राहिलेला नाही. पहिला सामना हरण्याची परंपरा यंदा मोडणार का याबाबत विचारले असता महेला हसत म्हणाला, हो, ही एक परंपरा झाली आहे, पण ती मोडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्ही मागील काही मोसमात अटीतटीचे सामने खेळलो आणि हरलो, पण यंदा मुलांच्या खेळात ती तीव्रता दिसेल. आम्ही प्रत्येक सामन्यासाठी सारखीच तयारी करतो, पण उद्या निकाल वेगळा असेल अशी आशा आहे.
बुमराहची ‘एन्ट्री’ आणि रोहितचा ‘फॉर्म’
गेल्या काही काळापासून दुखापतीमुळे चर्चेत असलेला हिंदुस्थानचा हुकुमी एक्का जसप्रीत बुमराह आता पूर्णपणे तंदुरुस्त असून तो पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध आहे. तसेच, 10 महिने टी-20 क्रिकेटपासून दूर असलेल्या रोहित शर्माबद्दल बोलताना महेलाने सांगितले की, रोहितमध्ये मला जबरदस्त बदल जाणवला आहे. नेटमधील त्याची फलंदाजी आणि त्याची जिद्द पाहून मी समाधानी आहे. 18 वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे, त्यामुळे गंज चढण्याचा प्रश्नच येत नाही.
हार्दिक पांड्याला दिग्गजांची साथ यंदा कर्णधार हार्दिक पांड्या याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. हार्दिकला मिळणाऱ्या मदतीबद्दल जयवर्धने म्हणाला, हार्दिकच्या संघात दोन टी-20 वर्ल्ड कप जिंकलेले कर्णधार (रोहित आणि इतर दिग्गज) आहेत. रोहित, सूर्या आणि ट्रेंट बोल्ट यांसारख्या खेळाडूंचा अनुभव हार्दिकला मैदानावर निर्णय घेताना खूप फायदेशीर ठरेल. हार्दिक स्वतः देखील सर्वांच्या कल्पना ऐकण्यास उत्सुक आहे.
गॅप महत्त्वाची नाही, तर….
मुंबईने बराच काळ जेतेपद पटकावलेले नाही, या प्रश्नावर महेलाने स्पष्ट केले की, आम्हाला प्रत्येक वर्षी जिंकायचे असते. गेल्या वर्षी आम्ही ट्रॉफीच्या खूप जवळ होतो. आमची विनिंग कल्चर तशीच आहे आणि आम्हाला खात्री आहे की यंदा आम्ही पुन्हा एकदा जेतेपद साजरे करू.


























































