
सामना प्रतिनिधी । बंगळुरू
‘आयपीएल’चा 12वा हंगाम सुरू होऊन पंधरा दिवस उलटले, पण अद्याप विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला एकही विजय मिळविता आलेला नाही. पाच पराभवांसह ‘आयपीएल’च्या गुणतालिकेत रसातळाला असलेल्या बंगळुरूपुढे उद्या (दि.7) श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असेल. दिल्लीविरुद्ध तरी बंगळुरूला विजयाची वाट सापडणार का? याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा असणार आहेत.
विराट कोहलीच्या बंगळुरूला झालं तरी काय, असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. विश्वचषक स्पर्धा जवळ आली आहे. कोहली ‘टीम इंडिया’चा कर्णधार आहे. त्यामुळे ‘आयपीएल’मधील अपयशाचा विश्वचषकातील त्याच्या कामगिरीवर परिणाम तर होणार नाही ना? अशी चर्चा आता क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध कोहली फॉर्मात आला ही या संघासाठी दिलासादायक बाब होय. मात्र 205 धावसंख्या उभारूनही आंद्रे रसेलच्या वादळात बंगळुरूच्या गोलंदाजांचा पाचोळा झाल्याने कोहली निराश झाला. बंगळुरूकडे कोहलीसह एबी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, मार्कस स्टोईनिस, मोईन अली असे स्टार फलंदाज आहेत. मात्र पाचपैकी दोन लढती जिंकलेल्या दिल्लीकडेही पृथ्वी शॉ, शिखर धवन, कर्णधार श्रेयस अय्यर, रिषभ पंत व ख्रिस मॉरिस असे एकाचढ एक फलंदाज आहेत.
गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास बंगळुरूच्या गोलंदाजांना अद्याप आपला दरारा निर्माण करता आलेला नाही. त्यामुळे दिल्लीच्या तगडय़ा फलंदाजीला रोखण्यासाठी त्यांचा कस लागणार आहे.
आजच्या लढती
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स (बंगळुरू)
थेट प्रक्षेपण : सायंकाळी 4 वाजता.
राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स (जयपूर)
थेट प्रक्षेपण : रात्री 8 वाजता.




























































