
बीसीसीआयने 2021 सालामधील आयपीएलमध्ये नवा संघ समावेश करण्याची योजना आखली आहे. अर्थात यावर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाहीए. डिसेंबर महिन्यात याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. पण आयपीएलमधील नववा संघ विकत घेण्यासाठी कमालीची चुरस दिसून येत आहे. गौतम अदानी यांचा अदानी ग्रुप व संजीव गोयंका यांचा आरपीएसजी यांच्यामध्ये हा संघ विकत घेण्यासाठी चुरस लागली आहे.
आयपीएलमध्ये अहमदाबाद हा नवीन संघ येण्याची दाट शक्यता आहे. गौतम अदानी यांनी याआधीही संघ विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता अहमदाबाद संघ आयपीएलमध्ये येणार असेल तर त्यांची दावेदारी आणखी मजबूत होणार आहे.
तीन ते चार आठवडय़ांत चित्र स्पष्ट
आयपीएलमध्ये नव्या संघाला 2021 सालापासूनच स्थान द्यायचे की 2022 सालापासून त्यांचा समावेश करायचा, तसेच खेळाडूंचा लिलाव हा मोठय़ा प्रमाणात करायचा की नाही याबाबतचा निर्णय येत्या तीन ते चार आठवडय़ांत घेण्यात येणार आहे. अशी माहिती आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिलकडून देण्यात आली.




























































