हा युद्धगुन्हा आहे, चूक नाही! मिनाबमधील शाळेवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यावरून इराणने अमेरिकेला फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात गेल्या महिन्याभरापासून युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या सुरुवातीला इराणमधील एका शाळेवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला होता. यात 175 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांचा मृत्यू झाला होता. यावरून आता इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शुक्रवारी अमेरिकेवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. मिनाबमधील शाळेवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ला ही चूक नसून युद्धगुन्हा आहे, अशा शब्दात अराघची यांनी अमेरिकेची पिसं काढली.

दक्षिण इराणमधील मिनाब शहरात असलेल्या शजराह तय्यबा प्राथमिक शाळेवर झालेला बॉम्बहल्ला हा टप्प्याटप्प्याने केलेला सुनियोजित हल्ला होता. या हल्ल्यात 175 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली, असे अराघची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेला व्हिडिओद्वारे संबोधित करताना म्हणाले.

अमेरिका आणि इस्रायल स्वत:कडे अत्यंत प्रगत युद्ध तंत्रज्ञान आणि अचूक डेटा सिस्टीम असल्याचा दावा करतात. अशा परिस्थितीत शाळेवर झालेला हा हल्ला मुद्दाम आणि हेतुपुरस्सर नव्हता यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. ही क्रूरता लपवली जाऊ शकत नाही किंवा ती समर्थनीय नाही. यावर सर्वांनी स्पष्ट शब्दांत निषेध नोंदवून दोषींना जबाबदार धरले पाहिजे, असे अराघची म्हणाले. तसेच प्राथमिक शाळेवरील हा हल्ला केवळ एखादी साधी घटना किंवा चुकीचा अंदाज नव्हता. अमेरिकेने आपली जबाबदारी झटकण्यासाठी दिलेली परस्परविरोधी विधाने त्यांचा गुन्हा लपवू शकत नाहीत, असेही ते म्हणाले.

28 फेब्रुवारीला शाळेवर हल्ला

गेल्या महिन्यातील 28 तारखेला मध्य पूर्वेत युद्धाला तोंड फुटले. इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने इराणवर एकामागोमाग एक क्षेपणास्त्र डागले. यावेळी मिनाबमधील एका शाळेवर क्षेपणास्त्र पडले आणि विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा मृत्यू झाला होता.

जगासमोर आणखी एका युद्धाचे काळे ढग; चीन तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत?

चुकून शाळेवर क्षेपणास्त्र पडले, अमेरिकेचा निष्कर्ष

दरम्यान, याबाबत अमेरिकन सैन्यानेही तपास केला होता. अमेरिकेचे टोमाहॉक क्रूज क्षेपणास्त्र चुकीमुळे शाळेवर पडले. अमेरिकेला इराणच्या एका लष्करी तळावर हल्ला करायचा होता. ज्या शाळेवर क्षेपणास्त्र पडले, ती इमारत पूर्वी त्या तळाचा भाग होती. जुन्या माहितीच्या आधारे लक्ष्य निश्चित केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे अमेरिकेने म्हटले होते. एवढेच नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कदाचित इराणनेच स्वतःच्या शाळेवर हल्ला केला असावा, असेही म्हटले होते.

इराण-अमेरिका संघर्ष आणखी तीव्र, 10 लाखांहून अधिक सैनिक सज्ज; तणाव शिगेला