जमिनीवरचं युद्ध भडकणार! अमेरिकेचे साडेतीन हजार सैनिक आखातात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सौदी अरबमधील अमेरिकेच्या हवाई तळावर इराणने हल्ला करून अब्जावधी डॉलर किमतीची विमाने उद्ध्वस्त केली. त्यानंतर इराण-अमेरिका संघर्ष आणखी तीव्र होण्याची भीती आहे. अमेरिकेने हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आखाती देशांमध्ये 3,500 पेक्षा जास्त अतिरिक्त सैनिक तैनात करण्याचे आदेश दिले असून 2,500 मरीन सैनिकांसह सज्ज असलेले अमेरिकेची ‘यूएसस त्रिपोली’ ही अत्याधुनिक युद्धनौका आखाती देशांमधील युद्धक्षेत्रात दाखल झाली आहे. मात्र अमेरिकेच्या इराणवर जमिनीवरून हल्ला करण्याच्या योजनांना इराणने गंभीर इशारा देत उत्तर दिले आहे. ट्रम्प यांनी इराणवर जमिनी कारवाईचा प्रयत्न केल्यास अमेरिकेचे सैनिक पर्शियन आखातात शार्क माशांचे खाद्य बनतील, असा इशारा इराणच्या लष्कराने दिला आहे.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डस् कॉर्प्सने अमेरिकेला इशारा देताना म्हटले, की डोनाल्ड ट्रम्प हे एपस्टिन प्रकरणामुळे ‘मोसाद’च्या दबावाखाली आहेत. ते इस्रायलच्या पंतप्रधानांचे प्यादे बनले आहेत. ट्रम्प यांनी जमिनीवरील कारवाईचा प्रयत्न केला तर त्यांचे सैनिक पर्शियन आखातात शार्क माशांचे खाद्य बनतील, असा इशारा इराणच्या लष्काराने एका व्हिडीओ संदेशात दिला.

‘या दोन अधिकाऱ्यांना विसरू नका’

अमेरिकेने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणमधील मिनाब शाळेतील 168 निष्पाप विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. या कारवाईला मंजुरी देणाऱया दोन अमेरिकन अधिकाऱयांची छायाचित्रे इराणच्या दूतावासांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहेत. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, या दोन गुन्हेगारांना लक्षात ठेवा. ली आर टेट आणि जेफ्री ई. यॉर्क यांनी तीन वेळा टॉमहॉक क्षेपणास्त्र डागण्यास परवानगी दिली. त्यांना त्यांची मुले नाहीत का, असा सवालही या पोस्टमधून इराणने केला आहे.

अमेरिकेचे अब्जावधी डॉलरचे नुकसान

सौदी अरबच्या प्रिन्स सुलतान हवाई तळावर इराणने केलेल्या हल्ल्यात अमेरिकेचे लष्करी निगराणी करणारे बोईंग ई-3 सेंट्री विमान नष्ट झाले आहे. हे विमान अत्याधुनिक रडारचा वापर करते व लष्कराला रिअल-टाइम माहिती पुरवते. या विमानांना दुसरा सोपी पर्याय नाही. या विमानाची किंमत अब्ज डॉलरपर्यंत आहे.

हिंदुस्थानचा श्रीलंकेला मदतीचा हात

इराण युद्धामुळे श्रीलंकेत इंधन टंचाई निर्माण झाली आहे. श्रीलंकेत केवळ दोन दिवसांचाच इंधन साठा शिल्लक होता. त्यामुळे इंधनाचे रेशनिंग करण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत हिंदुस्थानने श्रीलंकेला मदतीचा हात दिला असून 20 हजार मेट्रिक टन डिझेल आणि 18 हजार मेट्रिक टन पेट्रोल श्रीलंकेला पाठवले आहे.

पाकिस्तानात होणार अमेरिका-इराण चर्चा

अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानात चर्चा होईल, असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी केला आहे. इराणमधील युद्ध संपवण्यासाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे सौदी अरब, तुर्कीये आणि इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतर डार यांनी ही घोषणा केली. मात्र, याबाबत इराण किंवा अमेरिकेकडून प्रतिक्रिया आलेली नाही.

दोन एलपीजीवाहू जहाजे मुंबईकडे रवाना

होर्मुझची सामुद्रधुनी पार करून 94 हजार मेट्रिक टन एलपीजी घेऊन जाणारी दोन जहाजे हिंदुस्थानकडे येत आहेत. सरकारच्या माहितीनुसार, दोन्ही टँकर या आठवडय़ात मुंबईत पोहोचतील. यापूर्वी हिंदुस्थानी ध्वज असलेली चार एलपीजीवाहू जहाजे हा मार्ग पार करत हिंदुस्थानात दाखल झाली आहेत.

इराणचा इस्रायलमधील केमिकल प्लांटवर हल्ला

इराणने इस्रायलमधील बीर शेवा शहराजवळ एका केमिकल प्लांटवर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यामुळे कारखान्यात मोठी आग लागली. यात एक व्यक्ती जखमीही झाली आहे. हल्ल्यानंतर विषारी वायुगळतीचा धोका निर्माण झाल्याने सरकारने नागरिकांना घरातच थांबण्याचा आणि खिडक्या बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे.