#HappyBirthday एकाच दिवशी जन्मले हे 3 दिग्गज, दोघांची निवृत्ती; तर एक अजूनही गाजवतोय मैदान

आजच्याच दिवशी जगातील तीन दिग्गज डावखुऱ्या खेळाडूंचा जन्म झाला. एक गोलंदाज, तर दोघे विस्फोटक फलंदाज. यातील दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे, तर एक खेळाडू अजूनही आपल्या तुफानी खेळीने मैदान गाजवतोय. तीन वेगवेगळ्या देशात जन्मलेल्या या खेळाडूंनी अनेक विक्रम आपल्या नावे केलेत.

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण, श्रीलंकेचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज कुमार संघकारा आणि ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक खेळाडू डेव्हिड वॉर्नर यांचा आज जन्मदिन. तिघेही डावखुरे फलंदाज. इरफान आणि संघकारा यांनी निवृत्ती घेतली आहे, तर वॉर्नर अजूनही आयपीएलसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवताना दिसतोय. 27 ऑक्टोबरला जन्मदिन असणाऱ्या या तिघांच्या नावावर एक-एक खास विक्रम आहे.

इरफान पठाण

irfan-pathan

इरफान पठाण दोन्ही बाजूला स्विंग करण्यास सक्षम होता. 36 वर्षाचा झालेल्या इरफानने टीम इंडियाला 2007 चा वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. अंतिम लढतीत त्याने 4 षटकात फक्त 16 धावा देऊन 3 बळी घेतले होते. या दमदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला होता. पाकिस्तानविरुद्ध कसोटीत पहिल्या 3 चेंडूत 3 बळी घेऊन हॅट्ट्रिक करण्याची किमया इरफानने साधली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 301 बळींची नोंद असणाऱ्या इरफानने 2821 धावाही केल्या आहेत. क्रिकेटला रामराम केल्यानंतर आता तो समालोचन करताना दिसत आहे.

कुमार संघकारा

kumar-sangakkara

श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संघकारा 43 वर्षांचा झाला आहे. श्रीलंकेकडून एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा चोपणारा खेळाडू, तर सचिन तेंडुलकर याच्यानंतर सर्वाधिक धावा संघकाराच्या नावापुढे आहेत. संघकाराच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकाने 2014 चा टी-20 वर्ल्डकप आपल्या नावे केला. 134 कसोटीत 12,400 आणि 404 एकदिवसीय लढतीत 14,434 धावा संघकारा याने चोपल्या आहेत.

डेव्हिड वॉर्नर

warner

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा कणा असणाऱ्या डेव्हिड वॉर्नर याचाही आज जन्मदिन. कसोटी क्रिकेटमध्ये ब्रायन करा याच्या 400 धावांच्या खेळीनंतर सर्वाधिक नाबाद 335 धावा करणारा वॉर्नर हा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वॉर्नरच्या नावावर 43 शतक आहेत, तर 14,812 धावांची लयलूट त्याने केली आहे. आतापर्यंत तो 84 कसोटी, 126 एक दिवसीय आणि 81 टी-20 लढती खेळला आहे. सध्या तो आयपीएल खेळत असून सनरायझर्स हैद्राबाद संघाचा कर्णधार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या