
सामना प्रतिनिधी । कुडाळ
कुडाळ तालुक्यातील हुमरस ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकनचा बहुमान प्राप्त झाला असून याबाबतचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आले आहे, अशी माहिती हुमरस सरपंच अनुप नाईक यांनी दिली.
हुमरस ग्रामपंचायतीचा वर्धापन दिन सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच शिवछत्रपतींना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तसेच ग्रा.पं.ला औक्षण करण्यात आले. यावेळी सरपंच अनुप दयानंद नाईक, जि.प.सदस्य राजू कविटकर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, उपसरपंच महादेव परब, तंटामुक्त समिती अध्यक्ष ज.मु.कदम, डॉ.प्रसाद देवधर, विस्तार अधिकारी संजय ओरोसकर, शतक महोत्सव समिती अध्यक्ष आकेरकर सर, पोलीस पाटील सुरेश चव्हाण, ग्रा.पं. सदस्य सीताराम तेली, सुनीता तेली, कांचन राऊळ, श्रेया मेस्त्री, ग्रामस्थ व ग्रा.पं.कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या हस्ते आयएसओ मानांकनचे प्रमाणपत्र ग्रा.पं.ला प्रदान करण्यात आले. तसेच याबद्दल सरपंच श्री.नाईक, उपसरपंच महादेव परब व ग्रामसेविका यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच अपर्णा नाईक, बाबू परब, सतीश पडते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात सरपंच अनुप नाईक यांनी ग्रा.पं.च्या कार्याचा आढावा मांडला. सूत्रसंचालन सीताराम तेली यांनी केले तर आभार महादेव परब यांनी मानले.






























































