इस्रायलचा मीडिया कार्यालयांवर हल्ला; अल जझीरा, असोसिएटेड प्रेससह अनेक माध्यमांची कार्यालये उद्ध्वस्त

इस्त्रायल आणि हमास अतिरेकी संघटनेतील संघर्ष चिघळला आहे. गाजा शहरातील ‘गाजा टॉवर’ या इमारतीमध्ये असलेले हमासचे कार्यालय उडवण्यासाठी इस्त्रायलने ही इमारतच रॉकेट डागून नेस्तनाबूत केली. या इमारतीत अल जझीरा, अमेरिकेच्या असोसिएटेड प्रेससह इतर अनेक माध्यमांची कार्यालये होती. ही सर्व कार्यालये या हल्ल्यात उद्ध्वस्त झाली आहेत.

इस्त्रायल व हमास या पॅलेस्टिनी संघटनेत सुरू असलेला संघर्ष आता विकोपाला गेला आहे. गेल्या आठ दिवसांपासून इस्त्रायली डिफेन्स फोर्सने हमासच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली आहे.

शनिवारी इस्त्रायलने हमासच्या राजकीय संघटनेचे कार्यालय असलेली गाजा टॉवर ही इमारत रॉकेटचा मारा करून उडवून दिली. रॉकेट हल्ला करण्यापुर्वी परिसरातील अनेक इमारती रिकाम्या करण्यात आल्या. त्यानंतर इस्त्रायली लढावू विमानांनी रॉकेट डागून ही इमारत नेस्तनाबूत केली.

या इमारतीत जगभरातील अनेक माध्यमांची कार्यालये आहेत. हा माध्यमांवर हल्ला असल्याची ओरड होताच इस्त्रायलने हमासचे कार्यालय आमच्या निशाण्यावर होते. हल्ला करण्यापुर्वी आम्ही इमारत रिकामी करण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता असा खुलासा केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या