
<<श्रीकृष्ण हरचांदे>>
एखादी इमारत दुर्घटना घडली अथवा पावसाळा आला की, जुन्या व जीर्ण इमारतींचा प्रश्न चर्चेत येतो तसेच अनेक जण चर्चेतून या विषयावर विचार व सूचना मांडत असतात. विधिमंडळातही जनहिताच्या दृष्टीने यावर मोठी चर्चा होते. विधानसभा व विधान परिषदेमधील अनेक सन्माननीय सदस्य यावर आपले विचार मांडत असतात. शासनानेही महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) माधमातून यावर अनेक उपाययोजना आखल्याचे वृत्तपत्रांतून वाचनातही येते, परंतु त्याला किती प्रमाणात चालना मिळाली व त्या योजना कृतीतून किती प्रमाणात अमलात आल्या हे महत्त्वाचे आहे.
आज 85 वर्षे व त्याहून अधिक काळ जीर्ण असलेल्या इमारती मुंबईत आहेत. त्या इमारतीमधील भाडेकरू जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत व कधी एकदा या इमारतींची पुनर्बांधणी होते या प्रतीक्षेत आहेत. पावसाळा आला की, त्यापूर्वी या इमारतींची दुरुस्ती करण्याचा शासनाचा म्हाडाच्या माध्यमातून प्रयत्न होताना दिसतो. काही विभागांत तर या जुन्या व जीर्ण इमारतींची पुनर्बांधणी होणे हे गरजेचे असताना भाडेकरूंनी काय करावे व शासन व म्हाडाची भूमिका काय? याबाबत भाडेकरूंनी गंभीरपणे विचारविनिमय करून त्यावर मार्ग काढण्याची गरज आहे.
म्हाडाच्या 30 ते 50 वर्षांहून सुस्थितीत असलेल्या इमारतींची क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून (जुन्या धोकादायक इमारती एकत्रित करून त्यांचा विकास करणे) पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी होत आहे व त्याची चर्चा होत असताना ऐकिवातदेखील येते, परंतु त्याला अल्प प्रतिसाद लाभत असून काही ना कारणास्तव क्लस्टर डेव्हलपमेंटच्या कामास चालना मिळत नाही. मात्र म्हाडाच्या 30 ते 50 वर्षांहून सुस्थितीत असलेल्या इमारतींच्या मध्येच एखाद्या 85 वर्षे व त्याहून अधिक काळ जीर्ण असलेल्या इमारतीच्या पुनर्बांधणी होण्याच्या मार्गाला मात्र खीळ बसल्याची काही उदाहरणे आहेत. यामुळे जीर्ण व धोकादायक इमारतीत वास्तव्य करीत असताना मोठा धोका संभवतो आहे, अशा इमारतीच्या बाबतीत शासनाने म्हाडाच्या माध्यमातून स्वतः पुढाकार घेऊन या इमारतींचा पुनर्बांधणीचा मार्ग पूर्ण करण्याची गरज आहे.
भाडेकरू तत्त्वावर राहणाऱया व म्हाडा सेस भरणाऱया अनेक जीर्ण इमारती आज मुंबईत असून त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपण ज्या जीर्ण अवस्थेत असलेल्या इमारतीत राहतो, त्या इमारतीचे भविष्य काय? पुढे काय करावे? याचा गंभीरपणे विचार अशा अवस्थेत राहणाऱया भाडेकरू रहिवाशांनी एकत्रित येऊन करणे गरजेचे आहे. याबाबत अनेक ठिकाणची उदाहरणे पाहिल्यास काही मोजके रहिवासी (भाडेकरू) सोडल्यास इतर भाडेकरू पुनर्बांधणीकरिता गंभीरपणे एकत्रित येत नाहीत ही सध्याची स्थिती आहे.
आज मुंबईत गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ मोठय़ा प्रमाणात उंचच उंच इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे पाणी, विद्युत, वाहतूक व्यवस्था याचे काय? या समस्या पुढे वाढतच राहणार आहेत. मोठय़ा प्रमाणात उंचच उंच इमारती उभ्या होत असताना आज मुंबईत जे मूळचे सर्व कर भरून स्थानिक रहिवासी असलेल्या आणि 75 ते 80 वर्षे जुन्या इमारतीत अधिकृतरीत्या रीतसर कर भरून राहणाऱ्या भाडेकरूंच्या पुनर्वसनाचे (पुनर्बांधणी) काय? आज ज्या गतीने मुंबईत नव्याने इमारती उभ्या राहत आहेत त्याच पद्धतीने अधिकृतरीत्या राहणाऱ्या भाडेकरू व रहिवाशांच्या दृष्टीने जुन्या व जीर्ण इमारतींची पुनर्बांधणी होणे हे गरजेचे असून त्याकडे शासनाने प्राधान्याने लक्ष देणेही महत्त्वाचे आहे.



























































