
विलेपार्ले रेल्वे ब्रिजवर प्रवाशाला धक्का मारून त्याच्याकडील बॅग चोरणाऱ्या जादूगँगच्या म्होरक्याला रेल्वे पोलिसांच्या एसटीएफने अटक केली. नुमान अझीम शेख उर्फ डबू असे त्याचे नाव आहे.
व्यावसायिक असलेले तक्रारदार हे गेल्या महिन्यात मरीन लाइन्स ते विलेपार्ले असा प्रवास करत होते. विलेपार्ले येथे उतरून घरी जात असताना एकाने त्यांना धक्का मारून खाली पाडले. ते चष्मा उचलत असताना भामट्यांनी त्यांची कापडी पिशवी चोरून पळ काढला. त्या बॅगेत 2 लाख 58 हजार रुपयांचा ऐवज होता.
घडल्या प्रकरणी त्यांनी अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण (पश्चिम रेल्वे) यांच्या मार्गदर्शनाखाली एसटीएफचे शहाजी निकम आणि पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या दरम्यान नुमान हा जोगेश्वरी परिसरात येणार असल्याची माहिती एसटीएफच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी त्याला अटक केली असता त्याने चौकशीत मोहित ऊर्फ मुन्ना, वसीम आणि अजगरच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.





























































