जैन मुनींकडून जनकल्याण पक्षाची घोषणा, पालिका निवडणूक लढणार; पक्षचिन्ह कबुतर

दादरचा कबुतर खाना बंद झाल्याने संतप्त जैन मुनींनी शनिवारी शांतीदूत जनकल्याण पक्षाची घोषणा केली. पक्षचिन्ह कबुतर असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. कबुतरांमुळे महायुतीचेच सरकार जाईल, असा इशाराही जैन मुनींनी दिला.

मृत कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून महावीर मिशन ट्रस्टने दादर येथील योगी सभागृहात धर्मसभेचे आयोजन केले होते. या सभेत राजकीय पक्षाची घोषणा करत त्यांचा पक्ष आगामी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जैन मुनी नीलेशचंद्र यांनी सांगितले. हा फक्त जैन लोकांचा पक्ष नाही तर गुजराती-मारवाडय़ांची पार्टी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कबुतरांसाठी एक-दोन जण मेल्याने काय फरक पडतो, असे वादग्रस्त विधान जैन मुनींनी केले.