जैसलमेरचे सांस्कृतिक वैभव

3736

>> द्वारकानाथ संझगिरी

जैसलमेरमध्ये आम्ही राहत होतो. त्या हॉटेलचं नाव होतं नाचना हवेली. सौंदर्यवती तिथे नाचत असाव्यात आणि राजा नेत्रसुख लुटत असावा या माझ्या कयासाच्या त्या हॉटेलच्या मालकाने चिंधड्या उडवल्या. कुणा एका राजपूत सरदारच्या गावाचं नाव नाचना होतं. आजचा मालक त्या सरदाराच्या वंशावळीतला होता. चांगलं हिंदी, इंग्लिश बोलतानाही त्याच्या तोंडात ‘हुजुर’ हा शब्द इंग्रजांच्या तोंडात ‘थॅन्क यू’ जसा घर करून बसलेला असतो तसा बसलेला होता. वंशपरंपरा काही शब्द घट्ट धरून ठेवते. हवेली मस्त होती. माझी ‘सुईट रूम’ सरदाराची किंवा त्याच्या मुलाची बेडरूम (शयनगृह) असावी.

ब्रिटिशांच्या काळात त्या सरदाराने एक मोठा टबसुद्धा त्यात ठेवला हाता. हवेली हवेलीसारखी सजवल्याने फोटो सेशनची हौस मी भागवून घेतली. ही हवेली तिथल्या ‘माणिक चौक’ या प्रमुख बाजारपेठेच्या पायाशीच होती. तिथून रस्ता पुढे जैसलमेरच्या किल्ल्याकडे जात होता. हा किल्ला तब्बल दोनशे पन्नास फूट उंच आहे आणि त्याला तीन भिंती आहेत. या भिंती सॅण्डस्टोनच्या आहेत. सॅण्डस्टोनचे दोन गुणधर्म फार महत्त्वाचे. एक म्हणजे अस्मानीच्या सुलतानीचा त्यावर फारसा परिणाम होत नाही. ऊन, पाऊस, गारठा वगैरे नैसर्गिक सुल्तानी तो समर्थपणे झेलतो आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलाकुसर करण्यासाठी तो उत्तम दगड आहे. थोडक्यात आखूड शिंगी बहु दुधी! तीन भिंती उभारण्यामागचे तत्त्व म्हणजे डोंगरावरून घसरणारे दगड रोखणे आणि शत्रूने चाल केली तर त्याला तीन भिंती ओलांडाव्या लागतं आणि तो दोन भिंतीत सापडला की, सर्वात आतल्या भिंतीवरून त्याच्यावर दगड गरम पाणी, गरम तेल ओतलं जाई. सतराव्या शतकात आपल्या भिंतीना व्यापून बुरूज उभारले गेले. साधारण 1633 ते 47 च्या सुमारास! त्यावर तोफा ठेवल्या गेल्या.

त्या किल्ल्यावर जायला चार दरवाजे आहेत ते अर्थात चढणावर आणि नागमोडी वळणावर आहेत. वर रिक्षाने (टुकटुक) जाता येतं पण ज्याच्या छातीत आणि पायात दम आहे, त्यांनी वर चढत जावं. पहिलं द्वार हे गणेश पोळ. मग सुरज पोळ, भूतपोळ आणि हवा पोळ. प्रत्येक द्वार वळणावर असल्यामुळे शत्रूला मोठय़ा संख्येने वर चढणं कठीण जात असे. पहिले द्वार त्या बाजाराजवळ आहे. सुरज पोळकडे जाणाऱ्या रस्त्याचा चढ पन्नास-साठ अंशाचा असेल. तीन घोडेस्वार गड चढू शकतील एवढाच रस्ता रुंद आहे. तिसरा दरवाजा भूत दरवाजा. किल्ल्यात शिरण्याचा प्रयत्न करताना इथे अनेक सैनिकांचं रक्त सांडलय. म्हणून त्याला भूतद्वार म्हणतात. इथेच गणपतीचं आणि भवानी देवीचं मंदिर आहे. गणपती हा सुखकर्ता दुःखहर्ता म्हणून त्याचं मंदिर तिथे बांधलं गेलय असं सांगितलं जातं. आई भवानी माता ही शूरवीर भाटी राजपूतांची रक्षणकर्ती असं मानलं जातं. भवानी माता ही शिवाजी महाराजांचीसुद्धा! आम्ही राहत होतो त्या नाचना हवेलीचा मालक राजपुतांच्या शौर्यकथा मला सांगत होता. राजस्थान हे शौर्यभूमीच दुसरं नाव आहे. हे त्याच्या प्रत्येक शब्दातून ध्वनित होत होतं. तेव्हा मी म्हटलं, ‘महाराष्ट्र हीसुद्धा शूरवीरांची भूमी आहे. शिवाजी महाराज आणि अटकेपार झेंडा फडकावणाऱ्या मराठय़ांना विसरू नका.’ तो हवेली मालक पटकन म्हणाला, ‘शिवाजी महाराज पण मूळचे बिसोदिया राजपूत.’

शेवटचं द्वार आहे हवा पोळ. त्यासमोर राजमहाल आणि एक प्रशस्त चौक आहे. तिथे एक चौथरा आहे. त्यावर एक सिंहासन आहे. तिथे राजा बसायचा. आजूबाजूला राजपुत्र, मंत्री, सरदार असत. तिथे लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली जात. तिथेच तो आपल्या सैनिकांशी बोलत असे. दुसरा एखादा राजा आला त्याचं तिथेच स्वागत होत असे. तिथेच राज घराण्यातली लग्न होत. पण त्या चौकाला आणखीन एक काळी किंवा क्लेशदायक बाजूही आहे. राजघराण्यातल्या स्त्रिया तिथे सती जात आणि त्या चौकात जोहार करत. राजमहालाच्या द्वाराच्या आधी जी जागा आहे त्याला ‘सतीयोंका पखतियाँ’ असं म्हणतात. मराठीत सांगायचं तर सतीच्या पायऱ्या! तिथे आजही त्या भिंतीवर सती गेलेल्या स्त्रियांच्या हाताचे ठसे आहेत. ते पाहताना अंग शहारतं आणि मन विषण्ण होतं. अत्यंत क्रूर अशी ही चाल राजस्थानात फार मोठय़ा प्रमाणात होती. सती जाणं म्हणजे, नवऱ्याच्या चितेवर उडी घेणे. बायको मेली की पुरुष काही दिवसांतच बोहल्यावर चढत असे आणि स्त्रीला मात्र नवरा गेल्यावर चितेत उडी घ्यावी लागे. बरं त्या मध्ययुगीन कालखंडात राजेमहाराजे अनेक स्त्रीयांशी लग्न करत. त्या पलीकडे त्यांच्या अनेक रखेल्या आणि दासी असत. एका राजाच्या चितेत त्या सर्व उडी घेत. बऱ्याचदा स्त्रियांना अफू देऊन, त्या गुंगीत असताना चितेत ढकलत. त्या ललनांचे चित्कार ऐकू येऊ नयेत म्हणून ढोल जोरजोरात वाजवत. काही वेळा त्यांना चितेत ढकललं जाई. समाजात अशा स्त्रियांना ‘हुतात्मा’ मानत. त्यांचे पुतळे उभारत.

जोहार तर त्याहून भयानक गोष्ट होती. जैसलमेरमध्ये त्याला ‘साका’ म्हणतात. राजपूतराजे युद्धात हरले की, शत्रूच्या हातात स्त्रिया पडू नयेत म्हणून सर्व स्त्रिया प्रचंड आगीत उडी घेत. सर्व दोर कापल्याची जाणीव झाल्यावर शूर राजपूत सैनिक शत्रूवर तुटुन पडत आणि मारता मारता मरत. जैसलमेरच्या चौकात जिथे आम्ही उभे होतो तिथे तीन जोहार झाले होते. तो चौक माझ्याशी बोलतोय असा मला भास झाला. पहिला 1308 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या वेळी, नंतर दुसरा महमद तुघलखच्या वेळी आणि तिसरा अलिखानच्या वेळी. त्यावेळी राजपूत स्त्रियांनी चितेत उडी घेतली नाही तर त्यांची डोकी कापण्यात आली. त्यांना अर्धा जोहार म्हटलं गेलं.

त्या गडावर उत्कृष्ट अशी जैन मंदिरं आहेत. राजा हिंदू असला तरी त्या राजांना जैन धर्माबद्दल आदर होता. शेकडो जैन श्वेतांबर कुटुंबीय जैसलमेरमध्ये स्थायिक झाले होते. या किल्ल्यातील जैन मंदिरं पाहण्यासारखी आहेत. प्रत्येक खांब, छत कलाकुसरीने सजवलाय. लग्नाच्या रिसेप्शनला उभी असलेली वधू कशी नखशिखांत सजलेली असते. तसे तिथले प्रत्येक खांब सजले आहेत. तिथल्या चित्रकारांच्या मूर्तीवरचे शांत पण खोल विचारात गुंतलेले भाव फार जिवंत वाटतात आणि मंदिरात चक्क प्रणय करण्यात गुंतलेल्या स्त्री-पुरुषांची शिल्पं आहेत. सेक्स हासुद्धा माणसाच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे ही गोष्ट ते नमूद करतं. स्त्री ही शरीरसुखासाठी असते असं दर्शवणारी काही शिल्पं आहेत. त्या स्त्रियांचा शिल्पात चेहरा चंद्रासारखा आहे. कपाळ डोळे मोठे आहेत. नाक सरळ आणि उरोज उन्नत आहेत. अंगभर दागिने आहेत. थोडक्यात माणसाच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचं त्यात चित्रण आहे. त्यावेळी मुद्रण कला अस्तित्वात नव्हती. त्यामुळे समाजाचं चित्रण हे अशा शिल्पकलेतून किंवा पेंटिग्जमधून व्यक्त होत असे. पण या जैन मंदिरात झाडाच्या पानांवर लिहिलेली 426 पुस्तकं आहेत. त्यात जैनधर्म, इतिहास, काव्य, नाटय़, प्रेम, व्याकरण, न्याय, भोग, वेद आणि ज्योतिषाबद्दल माहिती सापडते. ती पुस्तक संस्कृत, प्राकृत, ब्रीज आणि राजस्थानी भाषेतली आहेत. हिंदुस्थानी संस्कृतीचे हे वैभव आहे, अभिमान वाटण्याजोगं!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या