
जालना जिल्ह्यातील अंबड – घनसावंगी तालुक्यातील काही गावात आज चक्रीवादळाने तडाखा दिला आहे. तर वादळ-वार्यासह गारपीट झाली आहे. चक्रीवादळामुळे एका वाहनावर उभे झाड कोसळले यात कार झाडाखाली दबली गेली. तर एकहेर्यात म्हशीच्या अंगावर झाड उन्मळून पडल्याने यात म्हस दगावली आहे. तर काही ठिकाणी घरावरील पत्रे उडाली आहेत. आजच्या निसर्गाच्या अवकाळीपणामुळे रब्बी हंगामातील गहु हरभर्यासह मोसंबी,आंबा आदी फळबागांची मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी हंगामातील टरबूज,खरबूज आदी पिके तर नेस्तनाबूत झाली आहेत.
मंगळवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी वार्यासह गारपिटीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. वडीगोद्री परिसरात मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वारा व गारांसह तुफान गारपीट झाली.विजांचाही गडगडाट झाला.वादळी वार्यासह अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकर्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.परीसरातील अनेक ठिकाणी झाडे पडली तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाली असून जनावरांना पण गारपीटीमुळे ईजा झाल्या आहेत. आधीच खरिप हंगामात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे अनुदान अद्याप शेतकर्यांना मिळाले नाही आणि आता परत गारपिटीने रब्बी पिके नेस्तनाबूत झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. अंबड तालुक्यातील वडीगोद्री, सुखापुरी व गोंदी महसूल मंडळात तुफान गारपीट झाली. करंजाळा, पिठोरी सिरसगाव, घुंगर्डे हदगाव, वडीगोद्री, धाकलगाव, भणंग जळगाव आदी भागात वादळी वार्यासह गारपीट झाल्यामुळे रब्बी हंगामातील गहु आणि हरबरा तर मोसंबी, आंबा बांगांची फळगळ होऊन मोठे नुकसान झाले. तर घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी परिसरात मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. काही वेळातच सोसाट्याचा वारा सुरू झाला त्यापाठोपाठ गारांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वार्याचा प्रचंड वेग असल्याने तिर्थपुरी परिसरातील खापरदेव हिवरा, एकलहेरा, भणंग जळगाव, गंगाचिंचोली, साडेगाव, दैठणा, जोगलादेवी, रामसगाव, शेवता, लिंगसेवाडी, बानेगाव, भोगगाव, मंगरूळ, कोठी, मुरमा, खालापुरी, दहीगव्हाण, अंतरावली टेम्भी, मुद्रेगाव, भायगव्हाण यासह अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. घरावरील पत्रे उडाली. एकलहेरा येथे प्रदीप खराबे यांच्या शेतातील बाभळीच्या झाडावर वीज पडली. झाडाखाली बांधलेली म्हैस त्यात दगावली नंतर झाड देखील उन्मळून पडले असल्याचे शेतकरी प्रदीप खराबे यांनी सांगितले. तिर्थपुरी येथे अंबड मार्गावरील कन्यादान मंगल कार्यालयासमोर बाभळीचे झाड रस्त्यावर तुटून पडले त्यात सुदामराव मुकणे यांच्या कारवर झाड पडले कारचे काही नुकसान झाले नाही. मात्र झाडांमुळे दोन तास वाहतूक बंद पडली होती. नंतर जेसीबीच्या साहाय्याने झाड बाजूला केल्यावर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. गारांमुळे आंबा, मोसंबीच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
































































