जालन्यात डेंग्यूसदृश्य तापाने नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू, इतरही काही बालके तापाने फणफणली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मूरमा येथे अक्षरा पंडित राठोड (9) या मुलीचा गुरुवारी डेंग्यू सदृश्य तापाने मृत्यू झाल्याची घटना घडली. गावात रिंकू ढोणे, आदर्श आढे, ईश्वरी आढे, अभिषेक राठोड यांनाही डेंग्यू सदृश्य ताप होता. त्यांना तातडीने जालना व छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात हलवून उपचार करण्यात आल्याने आता त्यांची प्रकृती बरी आहे.

गावात डेंग्यू सदृश्य आजाराने थैमान घालून एका मुलीचा मृत्यू होऊनही आरोग्य विभागाकडून पथक न पाठविता केवळ दोन आरोग्य कर्मचार्‍यांना पाठवले, त्यांनी संपूर्ण गावात संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने न घेता केवळ वरवर पाहणी करून फैलाव झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान एक महिन्यापूर्वी तीर्थपुरी येथेही डेंग्यू सदृश्य तापाने थैमान घातल्याने अनेकजण तापाने फणफणले होते. विशेषतः येथील वॉर्ड क्रमांक 6 मध्ये सहा ते सात जणांना डेंग्यु सदृश्य तापाची लागण झाली होती. त्यांच्यावर जालना येथे दीर्घकाळ उपचार करण्यात येऊन ते बरे झाले. दरम्यान मूरमा ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी गायकवाड यांना गावात डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आढळल्याने गावात सर्व्हे करण्यावीषयी ग्रामपंचायच्या वतीने सांगितले होते. त्यानंतर गावात आरोग्य विभागाचे दोन कर्मचारी फवारणीचे औषधी घेऊन गावात आले. त्यांनी आशा वर्करला गावात फिरून कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करा म्हणून त्यांच्याजवळ तापाच्या गोळ्या देऊन तसेच ग्रामपंचायतला फवारणी विषयी पत्र देऊन आल्यापावली परत गेले, संपूर्ण गावात आरोग्य तपासणी करून संशयीत रुग्णांच्या रक्ताची तपासणी करणे गरजेचे असतांना केवळ औपचारिकता पार पाडून ते परत गेले असल्याचे गावकरी संभाजी मुकणे यांनी सांगितले.